जळगाव - 'एकीचे बळ' काय असते हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील धारागीरवासीयांनी दाखवून दिले आहे. येथील ग्रामपंचायतीची निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध पार पडली आहे. गेल्या 50 वर्षांपासून येथील ग्रामपंचायत बिनविरोध होत असून, ग्रामस्थांनी इतिहासच रचला आहे. माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्या प्रयत्नातून 1970पासून धारागीर गावात ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेले नाही. धारागीरवासीयांनी ग्रामपंचायत बिनविरोधचे अर्धशतक पूर्ण करत राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल शहरापासून जवळच धारागीर हे गाव वसलेले आहे. सुमारे 1300 लोकसंख्येच्या या गावात सन 1970पासून ग्रामपंचायतीसाठी मतदान झालेले नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. गावातील परस्परातील एकोपा आणि सलोखा टिकून रहावा, गावाच्या विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची संकल्पना मांडली. ही परंपरा आज 50 वर्षे उलटूनही अबाधित आहे, हे विशेष. एकमेकांमधील वाद-विवाद, भांडण आणि तंट्यांमुळे गावाचा विकास होत नाही, हे ग्रामस्थांना पटल्याने वर्षानुवर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली जाते. यामुळे गावात सलोखा टिकून आहे.
अशी रुजली परंपरा
धारागीर गावात फार पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस असायची. ग्रामपंचायतीत निवडून येण्याच्या हव्यासापोटी भाऊबंदकीत वाद-विवाद व्हायचे. त्यामुळे ग्रामस्थांवर पोलीस ठाणे, प्रसंगी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ येत होती. शिवाय भांडण-तंट्यांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळत नव्हती. ही बाब लक्षात आल्याने ग्रामस्थांनी परस्परातील मतभेद, हेवेदावे दूर ठेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 1970पासून अंमलात आला. पुढे जाऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा पडला. तो आजतागायत सुरू आहे.
माजी आमदार महेंद्रसिंग पाटलांची संकल्पना
माजी आमदार महेंद्रसिंग पाटील हे याच धारागीर गावाचे रहिवासी आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून धारागीर गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडत आहे. 1970पूर्वी गावात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वाद निर्माण व्हायचे. त्यावेळी तारुण्यात असणाऱ्या महेंद्रसिंग पाटील यांनी गावातील इतर तरुणांच्या मदतीने निवडणूक बिनविरोध करण्याबाबत तत्कालीन गाव पुढाऱ्यांना विनंती केली. तरुणांचे मत पटल्याने सर्वांनी एकत्र येऊन एकोप्याच्या दिशेने पाऊल टाकले. नंतरच्या काळात महेंद्रसिंग पाटील हे धरणगाव-एरंडोल विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या विकासासाठी वेळोवेळी सकारात्मक निर्णय घेतले. म्हणून त्यांच्याच पुढाकाराने गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध पार पडत आहे.
सर्व समाजाला मिळते प्रतिनिधित्वाची संधी
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असल्याने गावात एकोपा टिकून आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना माजी आमदार महेंद्रसिंग पाटील म्हणाले, की वर्षानुवर्षे आमच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आहे. हे केवळ ग्रामस्थांच्या सामंजस्याने शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, आम्ही गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्वाची संधी देतो. त्यामुळे कुठेही स्पर्धा, हेवेदावे नसतात. प्रत्येक समाजाच्या सुशिक्षित आणि जाणकार व्यक्तीला नेतृत्वाची संधी मिळते. त्यामुळे आपसूकच नेतृत्त्व करू शकणाऱ्या लोकांच्या हातात ग्रामपंचायतीची सूत्रे जातात. या माध्यमातून प्रत्येक योजना अंमलात आणली जाते, असे महेंद्रसिंग पाटील यांनी सांगितले.
बिनविरोध झालेली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. छाननी प्रक्रियेनंतर आता जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. परंतु, धारागीर ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली बिनविरोध ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी केवळ सातच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
हेही वाचा - कोरोना लसीच्या आयात-निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी