जळगाव - सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावात सोन्याचे दर प्रथमच प्रती तोळ्याला 35 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरात नोंदविण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात विक्रमी वाढ आहे. डॉलर्सच्या दरात सुरू असलेली चढउतार, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम सोन्याचा दरांवर झाला आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर सोन्याचे दर हे 40 हजार रुपयांवर पोहोचेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क सुमारे दीड टक्क्यांनी वाढल्याने सोन्याचे दर वाढले होते. त्यानंतर डॉलरची सतत होणारी घसरण, इराण-इराक या देशांमधील अस्थिरता हे देखील सोन्याच्या दरवाढीमागचे प्रमुख कारण मानले जात आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतील बँकांनी ठेवींवरील व्याजदर घटवले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी डॉलर्सचे दर सतत अस्थिर राहत असल्याने डॉलर्सऐवजी सोन्याच्या गुंतवणुकीवर भर दिला आहे. त्यामध्ये सोन्याला मागणी वाढली आहे. म्हणून सोन्याचे दर सतत वाढत आहेत.
या आठवड्यात पहिल्या दिवशी सोमवारी जळगावात सोन्याचे दर ३४ हजार ९०० रुपये प्रतितोळा होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या दरात 200 ते 300 रुपयांची घसरण झाली. तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात घसरण झाली. गुरुवारी मात्र, सोन्याचे दर 500 रुपयांनी वाढले. शुक्रवारी त्यात पुन्हा 100 रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर प्रतितोळा 35 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अस्थिरतेमुळे सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे जळगावच्या स्थानिक बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सुवर्णनगरीतील उलाढाल मंदावली आहे.