जळगाव - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या जामनेर येथे रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाचे एकनाथ खडसे यांनाही निमंत्रण दिले आहे, असे माजीमंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. आता या कार्यक्रमाला खडसे उपस्थित राहणार की नाही? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीतर्फे आज महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील शासन निष्क्रिय झाले आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही राज्यभर आंदोलन करत आहोत, असे महाजन म्हणाले.
भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले, या विषयाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. परवा मुंबईत पक्षाची बैठक झाली, त्यावेळी खडसेंनी हजेरी लावली. त्यामुळे ते पक्ष सोडून जातील, असे आपणास वाटत नाही. जामनेर येथे उद्या (ता.१३) देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण होत आहे. त्या कार्यक्रमाचे खडसे यांना निमंत्रण दिले आहे. याशिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व सर्व पक्षाच्या आमदार, नेत्यांनाही निमंत्रण दिले असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.