जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हणून परिचित असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महाजन यांनी जामनेरमध्ये मुख्य रस्त्यावर रोड शो करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
हेही वाचा - पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेप्रमाणे तयार केलेल्या भल्या मोठ्या रथातून गिरीश महाजन यांनी रोड शो केला. यावेळी जामनेर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते या 'रोड शो'ला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे जामनेर विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. गेल्या 5 वर्षांच्या काळात जामनेर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केल्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून येतील, अशी आपल्याला खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासोबत लढत-
यावेळी गिरीश महाजन यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय गरुड यांच्याशी होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये प्रमुख सामना रंगणार असून त्यात कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष आहे.
हेही वाचा - मिळेल त्याला गळाला लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- गिरीश महाजन