जळगाव - अवकाळी पावसात वीज पडून २ शेळ्या व २ मेंढ्या ठार झाल्याची घटना जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा शिवारात घडली. या घटनेत शेळ्या व मेंढ्या चारणारा बालक आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. शुभम अनिल मदने (वय १५) असे बचावलेल्या बालकाचे नाव आहे.
काकोडा येथील अनिल दशरथ मदने या मेंढपाळाच्या मेंढ्या व बकऱ्या थेरोळा शिवारातील सुभाष तायडे यांच्या शेतात चरत होत्या. त्यावेळी पावसाला सुरुवात झाली. अचानक वीज चमकली आणि ही वीज कडकडाट करत बकऱ्या चरत असलेल्या ठिकाणाहून गेली. त्यामुळे विजेच्या धक्क्याने २ मेंढ्या व २ बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारी चरत असलेल्या बकऱ्यासुद्धा जखमी झाल्या. ८ मेंढ्या बकऱ्यांना डोळे व पायांना गंभीर जखमा झाल्या आहेत, त्यामुळे मेंढपाळाचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - ईपीएफओ धारकाचा मृत्यू झाल्यास ७ लाखापर्यंत रक्कम मिळणार
शुभमचे दैव बलवत्तर-
शुभम शेळ्या व मेंढ्या चारत होता. त्याचवेळी वीज चमकली. शुभम घाबरून थोडा लांब पळाला, त्यामुळे तो विजेपासून बचावला. मात्र, शेळ्या व मेंढ्या ठार झाल्या.
पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा-
या घटनेची माहिती मिळताच थेरोळा येथील पोलीस पाटील समाधान भोंबे घटनास्थळी दाखल झाले. याबाबत त्यांनी कुऱ्हा पोलीस चौकीला खबर दिली. पोलीस नाईक रवींद्र सपकाळे व कुऱ्हा पोलीस पाटील विजय पाटील यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी विशाल खोले, ग्रामपंचायत सदस्य मनोज हिवरकर, विशाल धुंदले, कोतवाल सुधाकर भोलाणकर, अरुण भोलाणकर, अरुण लोहार, रामेश्वर काकडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - 'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..