जळगाव - हाणामारी करताना गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासचक्रे फिरवत अवघ्या 5 ते 6 तासांत या गुन्ह्याचा उलगडा केलाय. राजू उर्फ बाबू अशोक सपकाळे (रा. क्रांती चौक, शिवाजीनगर), मिलिंद शरद सकट (रा. गेंदालाल मिल), मयूर उर्फ विकी दीपक अलोने (रा. आर. वाय. पार्क) आणि इम्रान उर्फ इमू शहा रशीद शहा (रा. गेंदालाल मिल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन बनावट पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत.
गुरुवारी सायंकाळी शहरातील उस्मानिया पार्क परिसरात हे सर्व एका शेतात मद्यपान करत बसले होते. त्यावेळी जवळून दोघे जात होते. यावेळी मयूरने कुठे जात आहात, अशी विचारणा करत त्यांच्याशी वाद घातला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. ही हाणामारी सोडवण्यासाठी आलेल्या सुफियान शकील बेग (रा. शिवाजीनगर, हुडको) याला मयुरने बिअरची बाटली मारून फेकली होती. त्यात सुफियानच्या चेहऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर मयूर अलोने याने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून हवेत दोन राऊंड फायर केले.
संबंधित घटना घडल्यानंतर उस्मानिया पार्क, शिवाजीनगर तसेच आर. वाय. पार्क परिसरात फायरिंग झाल्याची चर्चा पसरली. माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळीच पोलिसांनी राजू सपकाळे आणि मिलिंद सकट यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शिरसोली येथून रात्री 2 वाजता मयूर अलोनेला अटक केली. इम्रान शहा यालाही अटक करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून दोन गावठी कट्टे जप्त केले आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी हा गुन्हा उघड केला.