जळगाव - जिल्ह्यातील यावल शहरात असलेले ऐतिहासिक व्यास मंदिर गुरुपौर्णिमेला प्रथमच बंद राहिले. कोरोनाचा वाढत संसर्ग लक्षात घेता व्यास मंदिर प्रशासनाच्यावतीने यावर्षी गुरुपौर्णिमा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशीही मंदिर नागरिकांसाठी खुले करण्यात आले नाही.
यावल शहरातील ऐतिहासिक व्यास मंदिर हे राज्यभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरात दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी याठिकाणी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी एक आठवडाभरापूर्वीच तयारी सुरू होते. राज्यातून हजारो भाविका या कार्यक्रमाला हजेरी लावतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांना जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. सामाजिक भान जपत व्यास मंदिर प्रशासनाने गुरुपौर्णिमा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
आज सकाळी 8 ते 10 या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत महापूजा संपन्न झाली. लोकांची गर्दी टाळण्यासाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मंदिर प्रशासनाने याबाबतचे एक निवेदन जाहिर करण्यात आले होते.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. त्यामुळे दरवर्षी दणक्यात आणि उत्साहात साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव शांततेत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. शिर्डी, शेगाव, अक्कलकोट सारख्या धार्मिक स्थळांवर शुकशुकाट आहे.