जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 528 इतकी झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढतच चालला आहे.
जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, पहूर आणि रावेर येथील 22 कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले. त्यात 17 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर, 5 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये पहूर येथील 2 व्यक्तींचा तर जळगाव, जामनेर व रावेर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
218 रुग्णांची कोरोनावर मात -
जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 528 झाली आहे. त्यापैकी 218 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 64 रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोनाचा मृत्यूदर देखील कमी होत नसल्याने भीतीचे वातावरण आहे.