जळगाव - जिल्ह्यातील धरणगाव शहरात कमल जिनिंगमध्ये आग लागली. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेत शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाला. यामध्ये व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
धरणगावमध्ये जळगाव रस्त्यावर कमल जिनिंग आहे. या जिनिंगमध्ये बाहेर असलेल्या कापसाला अचानक आग लागली. कापसाला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस जळाला होता. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
हेही वाचा - आता विहीर शोधून द्या.. नाही तर आत्महत्या करतो, हिंगोलीतील शेतकऱ्याचा इशारा
ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. सुदैवाने जिनिंगच्या आतील भागापर्यंत आग पोहचली नाही अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. या घटनेची धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.