जळगाव - दुचाकी घसरल्याने ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार पिता-पुत्र जागीच ठार झाले. हा भीषण अपघात आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या नेरी गावाजवळ घडला. शेख रशीद शेख कालू (वय ६५) व त्यांचा मुलगा शेख आबीद शेख रशीद (वय २५) अशी अपघातात ठार झालेल्या पितापुत्राची नावे आहेत. ते जामनेर तालुक्यातील वाघरी येथील रहिवासी होते.
अखेरचा गुरांचा बाजार
नेरी येथे दर मंगळवारी गुरांचा बाजार भरतो. शेख रशीद हे गुरांचे व्यापारी असल्याने ते त्यांचा मुलगा शेख आबीद सोबत नेरीच्या बाजारात येण्यासाठी निघालेले होते. नेरी गावापासून काही अंतरावर त्यांची (एमएच १९ डीएल ४४६५) क्रमांकाची दुचाकी रस्त्यावरील चिखलामुळे घसरली. त्यामुळे दोघेही बाजूला चालणाऱ्या (जीजे १५ यूयू १७२६) क्रमांकाच्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत पिता पुत्राचा मृतदेह विच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
हेही वाचा - जळगावात पत्नीच्या मृत्यूनंतर तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, फेसबुक लाईव्ह करुन घेतला सर्वांचा निरोप
पोलिसांनी ट्रक घेतला ताब्यात-
या घटनेनंतर पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी आणि ट्रक ताब्यात घेतला. ट्रक चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेची नोंद करण्याचे काम जामनेर पोलीस ठाण्यात सुरू आहे. दरम्यान, जळगाव ते औरंगाबाद महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे काम अद्यापही अपूर्ण असल्याने या मार्गावर सातत्याने अपघात घडत आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला असून, संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
माजीमंत्री गिरीश महाजन यांची रुग्णालयात भेट -
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात माजीमंत्री गिरीश महाजन यांनी भेट देत नातेवाईकांचे सांत्वन केले. पीडित कुटुंबाला शासनाकडून मदत मिळवून देता येईल का? याबाबत माहिती घेण्याचेही आश्वासन दिले.
हेही वाचा - मध्य प्रदेशात पिकअप वाहनाचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू