जळगाव - महाराष्ट्र राज्यात विक्रीस मनाई असलेला लाखो रुपयांचा अवैध विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सांगवी शिवारात रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक, चाळीसगाव, अमळनेर आणि मालेगावच्या पथकांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली असून, त्यात लाखो रुपयांच्या विदेशी मद्याच्या साठ्यासह, 1 ट्रक असा सुमारे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सापळा रचून केली कारवाई-
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून लाखो रुपयांच्या विदेशी मद्याच्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्या अनुषंगाने विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांनी तातडीने नाशिक, चाळीसगाव, अमळनेर आणि मालेगाव येथील पथकांना सतर्क करून सापळा रचण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावर सांगवी शिवारात बोढरे फाट्याजवळ वाहन तपासणीसाठी पथके थांबली होती. रविवारी रात्री उशिरा (एमपी 09 एचजी 9354) क्रमांकाचा एक ट्रक त्याठिकाणी आला. ट्रकची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी मद्याचा साठा आढळून आला. पथकाने याप्रकरणी ट्रक चालक अजय कन्हैयालाल यादव (वय 41, रा. इंदूर, मध्यप्रदेश) याला अटक केली.
1 कोटींचा मुद्देमाल केला जप्त-
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुमारे 1 कोटी 3 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेली रॉयल ब्लू मॉल्ट व्हिस्कीच्या 180 मिलीलीटरच्या 60 हजार 480 बाटल्या (1260 बॉक्स), मद्य ठेवण्यासाठी असलेले 6 प्लायवूडचे खोके, चालकाचा मोबाईल फोन तसेच, टाटा कंपनीचा (एमपी 09 एचजी 9354) क्रमांकाचा ट्रकचा समावेश आहे.
याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. हे विदेशी मद्य कोठून आणले होते, ते कोठे नेले जात होते, त्याचा प्रमुख सूत्रधार कोण आहे, याचा शोध सुरू असल्याची माहिती विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सी. एच. पाटील यांनी दिली.