जळगाव - शरद पवारांचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा समाजाला प्रेरणा तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना उत्साह देणारा आहे. या देशात शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत, ज्यांचे सर्वपक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारण म्हटले की तुझं तोंड इकडे, माझं तोंड तिकडे अशी परिस्थिती असते. पण देशातील छोटे पक्ष असोत किंवा मोठे पक्ष असोत, साऱ्यांशी सलोख्याचे संबंध वर्षानुवर्षे टिकवून ठेवण्याचे काम पवारांनी केले आहे. म्हणूनच यूपीएच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांचे नाव चर्चेत आले. ही त्यांच्या कामाची पावती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जळगावातून एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या, त्यावेळी ते बोलत होते. शहरातील कांताई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजीमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार मनीष जैन, संतोष चौधरी, गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड. रोहिणी खडसे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरुड, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील आदींसह जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना मदतीचा हात देऊन त्यांना उभे करण्याचे महत्त्वपूर्ण काम शरद पवारांनी ज्या कौशल्याने केले, त्याला तोड नाही. पवारांनी ज्या पद्धतीने किल्लारी भूकंपग्रस्तांचा प्रश्न सोडवला, त्याच धरतीवर गुजरातच्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यात आली. ही पवारांच्या कामाची सर्वात मोठी पावती आहे. समाजात असे लोक फार मोजके असतात. अनेक जण जन्माला येतात, जन्माला येणारा प्रत्येक जण मरणार आहे. किती वर्षे जगले, यापेक्षा कसे जगले, काय कर्तृत्व केले, याला महत्त्व आहे, असंही खडसेंनी यावेळी म्हटले.
हे तर कुणाच्या स्वप्नातही नव्हते
शरद पवारांनी महाराष्ट्रात जे काम करून दाखवले, ते कुणाच्या स्वप्नातही नव्हते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांनी अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवल्या. एवढ्या जणांची एकत्र मोट बांधून त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. हा पवारांच्या कौशल्याचा एक भाग आहे. महाराष्ट्रात जे सरकार आहे ते त्यांच्याच आशीर्वाद, विश्वास आणि कल्पनेमुळे आहे.
कुठेतरी ओलावा होता म्हणून नाथाभाऊ राष्ट्रवादीत आले
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. ते दुरून आले असे नाही तर कुठेतरी ओलावा होता म्हणून नाथाभाऊ इकडे आले, असेही खडसेंनी यावेळी सांगितले. एका चांगल्या नेत्याच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली, या गोष्टीचा मला आनंद आहे. पवारांनी फक्त मलाच संधी दिली असे नाही, तर त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना संधी देऊन मोठं केले आहे. इतर नेत्यांकडे पहा, त्यांचे आकलन करा, काही नेते विशिष्ट गुणांनी मोठे असतील पण शरद पवार हे सर्वगुण संपन्न नेते आहेत. राजकारणाचा भाग सोडा, समाजकारणाच्या माध्यमातून साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रातही त्यांनी नाव कमावले असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटले.