जळगाव - पूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे सर्वांच्या टीकेचे धनी ठरलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थनात आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुढे सरसावले आहेत. माध्यमांनी गिरीश महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया खडसेंनी महाजन यांची पाठराखण करताना दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आयोजित एका कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या भूमिकेबद्दल आगपाखड केली आहे. ते म्हणाले, कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी गिरीश महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहोचविली. एवढेच काय तर स्वतः पाण्यात उतरून पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र, माध्यमांनी त्यांच्या या चांगल्या कार्याची दखल घेतली नाही. उलट त्यांच्या सेल्फीला प्राधान्य देत त्यांच्यावर टीका केली. माध्यमांच्या अशा टीकेचा आपल्यालाही फटका बसला आहे. आपण केलेल्या चांगल्या कामांपेक्षा दाऊदच्या बायकोशी आपले संबंध असल्याचे माध्यमांनी पसरविले. माध्यमांनी कोणत्याही वृत्ताची खात्री करूनच ते दाखवले पाहिजे. तरच माध्यमांची विश्वासार्हता वाढायला मदत होईल, असे मत खडसेंनी यावेळी व्यक्त केले आहे.
माध्यमांवर केले आरोप -
यावेळी एकनाथ खडसेंनी माध्यमांवर आरोप केले आहेत. टीआरपीच्या नादात माध्यमांनी आपण केलेली अनेक विधाने मोडतोड करून दाखविली. आजही मुंबई, पुण्यातील अनेक पत्रकार आपल्याकडे मुलाखतीसाठी आग्रह धरतात. मी जे काही बोलतो, त्यामुळे त्यांच्या चॅनेलचा टीआरपी वाढण्यास मदत होते. हे त्यांना माहिती असते, असेही खडसे कार्यक्रमादरम्यान म्हणाले.