जळगाव - जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर शुक्रवारी सकाळी एक हास्यास्पद प्रकार घडला. कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत दुचाकीचे पेट्रोल संपल्याने एका तरुणाने पेट्रोल भरण्यासाठी थेट बैलगाडीतून दुचाकी पेट्रोल पंपावर आणली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉक डाऊन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरी भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वसामान्य नागरिकांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्रीदेखील थांबवली आहे. ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेलसाठी वेळेची मर्यादा असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा परिस्थितीत भडगाव तालुक्यातील वाक वडजी गावातील एका तरुणाच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. गावापासून पेट्रोलपंप लांब अंतरावर असल्याने त्याने दुचाकी ढकलत न आणता तिला चक्क बैलगाडीतून पंपावर आणले. हा प्रकार पाहून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.