जळगाव - शहर महानगरपालिकेच्या आयुक्त पदी डॉ. माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. माधवी खोडे-चवरे या 2007 च्या आयएएस तुकडीतील अधिकारी आहेत. जळगाव मनपाच्या त्या 38 व्या आणि महिला आयुक्त म्हणून पहिल्या आयएएस अधिकारी असणार आहेत. डॉ. माधवी या 17 फेब्रुवारीपासुन आयुक्त पदी रुजू होणार आहेत.
हेही वाचा... अनुराधा पाटील यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या रिक्त जागी नागपूर येथील वस्त्रोद्योग मंडळाच्या संचालिका डॉ.माधवी खोडे-चवरे यांची नियुक्ती झाली. यापूर्वी त्यांनी भंडारा, चंद्रपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. 2013 ते 2015 पर्यंत भंडारा येथील जिल्हाधिकारी, 2015 ते 2018 पर्यंत आदिवासी विभाग,नागपूर येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्या कार्यरत होत्या. तर 2018 पासून वस्त्रोद्योग मंडळ, नागपूर येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
हेही वाचा... महागाईचा वाढता आलेख; जानेवारीत ७.५९ टक्क्यांची नोंद
2007 सालच्या आयएएस तुकडीतील अधिकारी
डॉ. माधवी या 2007 च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. त्यावेळी त्यांचा देशात 29 वा क्रमांक तर महाराष्ट्रातून त्या प्रथम होत्या. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण यवतमाळ येथे तर बारावीपर्यंतचे शिक्षण नागपूर येथील शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर येथे झाले. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण नागपूर येथील शासकीय मेडीकल कॉलेजमधून केले आहे. एमबीबीएसला देखील त्या सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या त्या पहिल्या आयुक्त आहेत.