जळगाव Diwali Padwa 2023 : सोन्याच्या खरेदीसाठी सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. दिवाळी पाडव्यानिमित्तानं सोनं-चांदीच्या खरेदी-विक्री 200 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफ व्यापाऱ्यानं दिली आहे. दिवाळी पाडव्यानिमित्तानं सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. पाडवा आणि भाऊबीजेपर्यंत खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी : दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसत असून आज पाडव्याच्या मुहूर्तावर जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. पाडव्यानिमित्तानं सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात सराफ बाजारात दाखल झाले आहेत. पत्नीला गिफ्ट देण्यासाठी पतींची लगबग दिसून येत आहे. धनत्रयोदशी ते भाऊबीज या दिवसांत सराफ बाजारात दागिने खरेदीसाठी मोठी गर्दी असते. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. आज पाडव्यानिमित्त सोन्याचा भाव 60 हजार 300 रुपये प्रति तोळा आहे, तर चांदीचा भाव 71 हजारांवर पोहचला आहे. येणाऱ्या काही दिवसात अजून भवात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या दरात वाढ : सकाळपासूनच सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. ग्राहकांच्या गर्दीमुळं सुवर्णनगरी आज चांगलीच गजबजली होती. गतवर्षी सोन्याचा भाव पन्नास हजार रुपयांपर्यंत होता, यंदा तो 60 हजार 300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यावर्षी सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळतेय.
आकर्षक दागिन्यांकडे कल : लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं सोनं तसंच चांदी खरेदी करण्याची पंरपरा आहे. मंगळसूत्र, बांगड्या, चेन, कानातले दागिने, खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी केली होती. त्यामुळं सराफ व्यावसायिकांनी देखील विविध आकर्षक डिझाईन्समधील सोन्याचे दागिने ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव वाढल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं, असलं तरी सोनं खरेदीसाठी महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
गुंतवणुकीसाठी सोनं फायदेशीर : दसरा, दिवाळी, पाडवा या सणानंतर सुरू होणाऱ्या विवाहसोहळ्यांमुळं सोन्या-चांदीच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो. गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून ग्राहक सोनं, चांदीकडं पाहतात. त्यामुळं ग्राहकांनी सोन्या-चांदीच्या दुकानांकडं मोर्चा वळवल्याचं चित्र बाजारात दिसून येत आहे. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज आदी महत्त्वाच्या प्रसंगी सोनं-चांदी खरेदी करण्याकडं ग्राहकांचा कल असतो. या सणानंतर विवाहसोहळा सुरू होतो. त्यामुळं सोन्या-चांदीच्या दुकानांत गर्दी होते. सोन्या-चांदीतील गुंतवणूक इतर गुंतवणुकीच्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरत असल्यानं ग्राहक गुंतवणुकीसाठी सोने-चांदीची खरेदी करत असल्याचंही चित्र आहे.
हेही वाचा -
- Diwali 2023 : 'सुवर्णनगरी'त सोन्याला 'झळाळी': दिवाळीत सोनं खरेदीतून झाली 200 कोटींची उलाढाल
- Diwali Shopping Of Irshalwadi Children : इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त चिमुकल्या मुला-मुलींच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या खरेदीमुळे फुलले अनोखे हास्य
- Dhanteras 2023: धनत्रयोदशीच्या निमित्ताने सुवर्णनगरी जळगाव ग्राहकांनी गजबजली; सोनं खरेदीसाठी चढाओढ