जळगाव - बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांपैकी दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे घडली. शेख दानिश अरमान (वय १७) व शाहीद खान रहमान खान (वय १६) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! जळगावात कार पुलावरून २५ फुट खाली कोसळूनही चालक बचावला
दोघेही अमळनेर शहरातील कसाली मोहल्ल्यातील रहिवासी होते. दानिशचा मृतदेह हाती लागला असून शाहिदच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. कसाली मोहल्ल्यातील काही युवक मंगळवारी दुपारी अमळनेर शहरापासून जवळच असलेल्या हिंगोणे परिसरात बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. नदीत पोहत असताना दानिश व शाहिद हे नदीपात्रात खोली असलेल्या भागामध्ये गेले. सध्या दमदार पावसामुळे बोरी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठे खड्डे असून त्यात पाणी साचले होते. पाण्याच्या खोलीच्या अंदाज न आल्याने दानिश व शाहिद हे बुडाले.
हेही वाचा - मंगरुळजवळ भरधाव कारची दुचाकीला धडक; दाम्पत्य जागीच ठार, मुलगा जखमी
मृत दोघांसोबत एक युवक देखील बुडाला. मात्र, सुदैवाने काही लोकांनी धाव घेतल्याने त्याला वाचवण्यात यश आले. परंतु, दानिश व शाहिद यांना वाचवता आले नाही. दरम्यान, या घटनेची माहिती होताच अमळनेर शहरातून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी देखील लागलीच शोधकार्य सुरू केले. खूप वेळ शोध घेतला असता दानिशचा मृतदेह हाती लागला. पण शाहिदचा मृतदेह सापडला नव्हता. या घटनेमुळे कसाली मोहल्ल्यावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा- गिरणा धरण १०० टक्के भरले ; जळगावचा पाणीप्रश्न निकाली