जळगाव - सध्या राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सगळ्याच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. येत्या १५ तारखेला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून गावोगावात या निवडणुकीचे प्रचार सुरु असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आंतरराष्ट्रीय स्तरावर होताना पाहायला मिळत आहे. डांभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार शुभम गिरीश विसवे यांच्यासाठी त्यांचे मित्र थेट ऑस्ट्रेलियातून प्रचार करताना दिसत आहेत.
शुभम गिरीश विसवे हे डांभुर्णी (ता. यावल) ग्रामपंचायत निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 चे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी ऑस्ट्रलियातील मेलबर्नमधील त्यांच्या मित्रांकडून सोशल मीडियावर प्रचार करण्यात येत आहे. या प्रचाराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. शुभम यांच्या मित्रांनी मेलबर्नमध्ये ठिकठिकाणी बॅनर झळकावून शुभम विसवे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
उच्चशिक्षित असूनही समाजकारणाचा ध्यास-
शुभम विसवे यांच्या आजी सरस्वती विसवे या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आहेत. यावर्षी त्यांच्यासोबत त्यांच्या आई देखील डांभुर्णी ग्रामपंचायत निवडणूक लढवत आहेत. हल्लीच्या काळात घरातील व्यक्ती उच्चशिक्षित झाला की त्याने मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरात स्थायिक व्हावे, अशी कुटुंबीयाची इच्छा असते. परंतु, शुभम विसवे यांनी त्याच्या शिक्षणाचा फायदा गावकऱ्यांना व्हावा म्हणून घेतलेल्या निर्णयाचे घरच्यांनी स्वागत केले आहे.