जळगाव - एकाच समाजातील तरुण आणि तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडले. प्रेमाच्या आणाभाका घेताना त्यांनी जन्माजन्माचे साथी होण्याची स्वप्ने पाहिली. पण समाज आणि कुटुंबीय आपल्या प्रेमाला मान्यता देणार नाहीत, अशी समजूत करून घेत दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शेवटी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावले. हा प्रसंग एखाद्या चित्रपटाचे कथानक नाही, तर जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे गावात घडलेली ही हृदयद्रावक घटना आहे.
रविवारी घडली घटना -
मुकेश कैलास सोनवणे (22) आणि नेहा बापू ठाकरे (19) अशी या घटनेतील मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. त्यांनी शनिवारी रात्री वाडे गावातील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीतील वरच्या मजल्यावर जिन्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली होती. मुकेश हा वाडे गावातील रहिवासी होता. तर नेहा ही मालेगाव तालुक्यातील पाळत गावातील मूळ रहिवासी होती. वाडे हे तिचे मामाचे गाव होते. तिचे कुटुंबीय सध्या वाडे येथे वास्तव्याला होते.
दोघांचे एकमेकांवर जडले होते प्रेम -
मुकेश आणि नेहा यांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, दोघे एकाच समाजातील होते. त्यामुळे कुटुंबीय आणि समाज आपल्या प्रेमाला मान्यता देणार नाही, असा त्यांचा समज होता. त्यातच मुकेश याला पाहण्यासाठी पाहुणे येणार होते. आपले लग्न होणार नाही म्हणून दोघेही नैराश्यात आले होते. त्यांनी शनिवारी रात्री माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
एकाच वेळी निघाली अंत्ययात्रा, स्मशानभूमीत लावले लग्न -
या घटनेनंतर भडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांची एकाचवेळी अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापूर्वी दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर संमतीने दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे दोघांचे लग्न लावण्यात आले. मृत्यूनंतर अनंतात विलीन झाल्यावर दोघे जन्माजन्माचे साथीदार झाले.