जळगाव - भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा भीषण अपघात आज (रविवार) दुपारी अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ घडला. या अपघातात मृत दाम्पत्याचा 7 वर्षाचा मुलगा प्रियांश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अनिल पितांबर वाघ (वय 32) आणि सोनाली अनिल वाघ (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. वाघ दाम्पत्य हे अमळनेर तालुक्यातील जानवे गावातील रहिवासी होते. ते दुचाकीने अमळनेर येथे दवाखान्यात जात होते. लोंढवे ते मंगरूळ गावादरम्यान त्यांच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या कारने जोरात धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - जळगाव-मुंबई विमान सेवेचा श्री गणेशा; ५८ प्रवाशांना घेऊन झेपावले पहिले विमान
या घटनेची माहिती कळताच वाघ यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघातात कार आणि दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.