जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाल्याने जळगाव जिल्ह्यात हजारो क्विंटल केळी शेतातच कापणीविना पडून आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने केळीची देशांतर्गत वाहतुकीच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी अखिल भारतीय केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष भागवत पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : जळगाव जिल्ह्यासाठी खते आणि बियाण्यांची मुबलक प्रमाणात उपलब्धता
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर जिल्हा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते आहे. आता निर्यातक्षम केळी काढणीचा हंगाम आहे. परंतु, सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतमाल वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात हजारो क्विंटल केळी कापणीविना शेतातच पडून आहे. तसेच कापणी झालेली केळी व्यापारी कवडीमोल भावात खरेदी करत आहेत. केळी हा नाशवंत माल असल्याने शेतकरी नाईलाजाने केळी विकत आहेत. सध्या केळीला 400 ते 600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो आहे. हाच दर या हंगामात 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल असतो. मात्र, कोरोनाच्या नावाखाली व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, असेही भागवत पाटील म्हणाले.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : लॉकडाऊनमुळे जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीत झाली घट
केळीला हवा योग्य दर :
केळी उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या खर्च पाहता शासनाने केळीला योग्य दर दिला पाहिजे, ही केळी उत्पादकांची नेहमीची मागणी आहे. परंतु, सध्या लॉकडाऊन असल्याने केळीच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. 4 ते 5 लोकांपेक्षा जास्त जण एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे केळीची कापणी आणि वाहनांमध्ये लोडिंग कशी करावी, हा प्रश्न शेतकरी तसेच व्यपाऱ्यांसमोर आहे. शासनाने त्यावर मार्ग काढला पाहिजे. सध्या केळीला मिळणारा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. केळीला किमान 1200 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला पाहिजे, असेही भागवत पाटील यांनी सांगितले.