जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेच्या 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. वरणगाव नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची शुक्रवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल आज (सोमवारी) दुपारी प्राप्त झाले. त्यात नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील तब्बल 14 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वरणगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील 14 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने दैनंदिन कामकाजावर देखील मोठा परिणाम होणार आहे. 14 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांचेही कोरोना चाचणीसाठी स्त्राव घेतले जाणार असल्याची माहिती मिळाली.
नागरिकांना केले खबरदारीचे आवाहन-
दरम्यान, नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यंत तातडीचे काम असेल तरच नगरपरिषदेच्या आवारात यावे, अन्यथा व्हॉट्सअप किंवा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करून आपल्या कामाचा निपटारा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 14 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपरिषदेच्या इमारतीतील प्रत्येक विभागात तातडीने सॅनिटायझेशन करण्यात आले.
एकाही कर्मचाऱ्याला अद्याप मिळालेली नाही लस-
वरणगाव नगरपरिषदेच्या एकाही कर्मचाऱ्याला अद्याप कोरोनाची लस देण्यात आलेली नाही. कोरोनाची लस घेण्यासाठी कोविन ऍपवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. लवकरच कोरोनाची लस दिली जाईल, अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा व आरोग्य अभियंता गणेश चाटे यांनी दिली.
हेही वाचा- राज्यात सोमवारी 8 हजार 744 नवे कोरोनाबाधित; 22 रुग्णांचा मृत्यू