जळगाव - राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्याच्या ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रंग भरायला सुरुवात झाली. तर जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीविषयी संभ्रमावस्था आहे. कारण नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची अधिसूचना राज्य शासनाने जारी केली आहे. त्यामुळे नशिराबाद नगरपंचायतीची घोषणा कधीही होऊ शकते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक मंडळी रिंगणात उतरावे किंवा नाही, अशा संभ्रमावस्थेत आहेत.
नशिराबाद हे गाव जळगाव शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर वसलेले गाव आहे. गावाची लोकसंख्या 50 हजारांच्या आसपास असून त्यात 25 ते 28 हजार मतदार आहेत. गावातील 6 वॉर्डातून 17 सदस्यांची ग्रामपंचायतीवर निवड होते. 3 महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीची मुदत संपली. सध्या प्रशासक नियुक्त आहे. राज्यातील ग्रामपंचायतींसोबतच नशिराबादची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. परंतु, नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासंदर्भात राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. याची अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक होईल किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नशिराबादला काहीसे शांत वातावरण आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्येही नाराजी असून, राज्य शासनाच्या घोषणेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
इच्छुकांचे आस्ते कदम-
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात नेतेमंडळी व इच्छुक गुंतले आहेत. काही इच्छुकांनी तर प्रत्यक्ष आणि सोशल मीडियावर आपला प्रचारही सुरू केला आहे. परंतु, ग्रामपंचायत निवडणूक होईल का? याची खात्री नसल्याने काही इच्छुकांचे 'आस्ते कदम' म्हणत राज्य शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
इच्छुकांसह कार्यकर्त्यांची होतेय घालमेल-
नशिराबाद ग्रामपंचायतीची निवडणूक होते किंवा नाही, अशी स्थिती आहे. दुसरीकडे, राज्य शासनाकडून नगरपंचायतीची घोषणा तर होणार नाही ना? अशा परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची घालमेल सुरू आहे. तिकडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात येत आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीची घोषणा झाली नाही तर निवडणूक लढवण्याची संधी हातून जाऊ नये, म्हणून काही इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत ते मोर्चेबांधणीला लागले आहेत.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला-
नशिराबाद ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दिग्गजांची कसोटी पणाला लागत असते. यावर्षी विविध वॉर्डामध्ये वॉर्ड रचना बदलल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
इच्छुकांमध्ये चढाओढ-
ग्रामपंचायत निवडणुकीत आता रंगत येत असल्याचे चित्र आहे. नशिराबादला देखील इच्छुकांमध्ये प्रचंड चढाओढ आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, माजी सरपंच विकास पाटील, पंकज महाजन, प्रदीप बोढरे, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, विनोद रंधे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या लिना महाजन, योगेश कोलते, दीपक खाचणे अशी दिग्गज मंडळी रिंगणात असण्याची शक्यता आहे.
नेतेमंडळी काय म्हणाले-
ग्रामपंचायत निवडणुकीच्या संभ्रमावस्थेबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील म्हणाले की, नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासंदर्भात अधिसूचना जारी झाली आहे. परंतु, राज्य शासनाकडून अद्याप त्या संदर्भात घोषणा नसल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक होईल किंवा नाही यात शंका आहे. एकीकडे हा निर्णय अधांतरी असताना दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था आहे. राज्य शासनाने नगरपंचायती संदर्भातला निर्णय लवकर जाहीर करावा, असे लालचंद पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, माजी सरपंच पंकज महाजन यांनी सांगितले की, नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निवडणुकीविषयी प्रचंड उत्सुकता आहे. परंतु, नगरपंचायतीच्या संदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत घोषणा झाली नसल्याने या निवडणुकीबाबत संभ्रमावस्था आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर गावाच्या विकासाला चालना मिळेल. राज्य शासनाकडून थेट निधी प्राप्त करुन घेण्यावर आमचा भर राहील. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यादृष्टीने आमची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे महाजन यांनी सांगितले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही वाटते नगरपंचायत व्हावी-
गेल्या काही वर्षात नशिराबादचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. अशा परिस्थितीत ग्रामपंचायत मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात कमी पडत आहे. त्यामुळे आता नगरपंचायत होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही नगरपंचायत व्हावी, असे वाटते. कारण ग्रामपंचायतीवर कर वसूली संदर्भात मर्यादा येतात. त्यामुळे वेळेवर पगार न होणे यासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत झाल्यानंतर राज्य शासनाकडून थेट निधी प्राप्त होईल. याशिवाय राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळेल, अशी अपेक्षा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आहे.
हेही वाचा- 'ईडी नोटीस'प्रकरणी राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट