जळगाव - टाळेबंदीच्या सुुरुवातीच्या काळापासून बंद असलेली रेल्वेची पॅसेंजर सेवा अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे गोरगरिबांना अत्यल्प दरातील रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागत आहेत. अशा स्थितीत प्रवाशांना खिशाला झळ सोसावी लागत आहे.
टाळेबंदी खुली केल्यानंतर रेल्वेने एक्सप्रेस सेवा सुरू केली. मात्र पॅसेंजर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू केली नाही. सलग नऊ महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे सेवा बंद असल्याने नागरिकांना महागड्या रेल्वे तिकीटाने प्रवास करावा लागत आहे.
हेही वाचा-year Ender 2020: उद्योगजगताच्या वर्षभरातील ठळक घडामोडींचा मागोवा
प्रवाशांची गैरसोय कायम-
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर गाड्यांसह अन्य रेल्वे गाड्या बंद केल्या होत्या. केंद्र सरकारकडून हळूहळू टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे विशेष रेल्वे गाड्यांची सेवा सुरू झाली आहे. सध्या केवळ आरक्षित तिकीट केलेल्या प्रवाशांनाच रेल्वेत प्रवास करता येतो. या रेल्वेतील तिकीट दर अधिक असल्याने गोरगरीबांना आरक्षण करणे शक्य होत नाही. तसेच आरक्षणाची प्रक्रिया बहुतांश निरक्षर प्रवाशांना माहिती नसल्याचे ते आरक्षण करू शकत नाही. कमी अंतराच्या प्रवासासाठी आरक्षणही होत नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम आहे. मुंबईतील लोकल सेवाही सध्या ८० ते ८५ टक्के सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही पॅसेंजर सेवा बंदच आहे. भुसावळ-अमरावती, वर्धा, नागपूर, नरखेड, कटनी, नाशिक - देवळाली, सुरत आदी रेल्वेच्या सर्व पॅसेंजर बंद आहेत. सर्व पॅसेंजर सुरू कराव्यात, अशी प्रवाशांनी मागणी केली आहे.
हेही वाचा-केंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध रद्द
प्रवासाचा खर्च वाढला-
कमी तिकीट दर असलेल्या पॅसेंजर गाड्या ९ महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांना एसटी किंवा खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा खर्च वाढला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरकारने पॅसेंजर रेल्वे सेवा बंद ठेवली आहे.