जळगाव - शहरातील विविध कॉलन्या, उपनगरांसह सर्वच प्रमुख रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहेत. खराब रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अनेक रस्त्यांची इतकी बिकट अवस्था आहे की त्यावरून वाहने तर सोडा; पण पायी चालणेही मुश्किल आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्यावरून वाहन गेल्यानंतर धुळीचे लोळ उडतात. यामुळे रस्त्याशेजारी राहणारे नागरिक तसेच व्यावसायिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ओबडधोबड असलेल्या रस्त्यांवरून वाहने घसरत असल्याने अपघातदेखील वाढले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दुसरीकडे, विकासकामेही संथगतीने सुरू असल्याने जळगावकर नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
जळगाव शहरात मार्च 2018 पासून केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांसह विविध कॉलन्या आणि उपनगरांमधील रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. या कामामुळे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आल्यानंतर रस्ते व्यवस्थितरित्या बुजविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर माती, दगड-गोटे पसरलेले आहेत. या रस्त्यांवरून वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवर माती असल्याने त्यावरून वाहने गेली की मोठ्या प्रमाणात धूळ उडते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून अनेकांना श्वसनाचे विकार जडत असल्याचा तक्रारी आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहतुकीला देखील अडसर निर्माण होत आहे.
जळगाव शहरातील रस्ते खड्ड्यात रस्ते दुरुस्त करण्याची मागणी-महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले होते. पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ता व्यवस्थित बुजलेला नाही. त्यामुळे नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहरातील रस्त्यांची कामे केली जातील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु, अमृत योजनेचे काम पूर्ण होण्यास अजून खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे ज्या परिसरात पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे; तेथील रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खराब रस्त्यांच्या विषयावर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी सत्ताधारी भाजपचा चिमटा घेतला. 'शहरातील रस्ते सुस्थितीत आहेत. नागरिक किंवा विरोधकांची काहीएक तक्रार नाही. सत्ता मिळवण्यासाठी भाजपने वर्षभरात शहराचा कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते. आज दोन वर्षे पूर्ण होऊनही शहरात एकही काम पूर्ण झालेले नाही आणि पुढे पण काही होणार नाही. दोन वर्षे निघून गेली, पुढची तीन वर्षेही अशीच जातील. शहरवासीयांना अशाच यातना भोगायच्या आहेत', अशा उपहासात्मक शब्दांत जोशींनी भाजपच्या कारभारावर टीका केली.
जळगाव शहरातील रस्ते खड्ड्यात उपनगरांमध्ये पक्के रस्ते नाहीत-शहरातील पिंप्राळा, निमखेडी, एमआयडीसी, मेहरूण यासह अनेक भागात अद्यापही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. अनेक भागांमध्ये तर गेल्या 15 ते 20 वर्षांपासून रस्त्यांची निर्मितीच झालेली नाही. अमृत योजनेमुळे आहे, त्या रस्त्यांचीही दूरवस्था झाल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अमृत योजनेचे काम गतीने पूर्ण करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, भाजपची महापालिकेत सत्ता येऊन दोन वर्षे झाली. पण अजून शहरात रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. विकासकामेही संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आम्ही वेळोवेळी आंदोलने केली परंतु, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही, अशी खंत शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
जळगाव शहरातील रस्ते खड्ड्यात अमृतनंतर भुयारी गटार योजनेचा अडथळा-शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांची रस्ते दुरुस्तीची मागणी आहे. अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य नव्हते. आता अमृत योजनेनंतर भुयारी गटार योजनेचे काम होणार आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण झाल्यानंतरच शहरातील रस्ते दुरुस्तीला मुहूर्त मिळेल, असे चित्र आहे. अमृत योजनेच्या कामासाठी ठेकेदाराला मार्च 2020 ची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावकरांना चांगल्या रस्त्यांसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे.
विकासकामांनाही ग्रहण-शहरात काही विकासकामे सुरू आहेत. परंतु, ही कामे संथगतीने सुरू आहेत. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल, पिंप्राळा उड्डाणपूल, अमृत योजना, भुयारी गटार योजना, राष्ट्रीय महामार्गावरील समांतर रस्ते अशा कामांची गती मंदावली आहे. अमृत योजना ही 253 कोटी रुपयांची आहे. सद्यस्थितीत त्यात नवीन जलवाहिनी टाकण्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. सात जलकुंभांचे 55 टक्के काम झाले आहे. त्याचप्रमाणे 169 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना सुरू असून, तिचे 40 ते 45 टक्के काम झाले आहे. या दोन्ही योजना पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यांची कामे सुरू होतील.Conclusion:शहरातील 54 रस्त्यांची यादी तयार-रस्त्यांच्या विषयाबाबत भाजपच्या वतीने स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'कडे भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, शहरात अमृत पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत. या दोन्ही योजनांमुळे रस्त्यांची कामे करण्यास मर्यादा आहेत. परंतु, आम्ही शहरातील प्रमुख 54 रस्त्यांच्या कामासाठी यादी तयार केली असून, तिच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय प्रत्येक प्रभागातील रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे. लवकरच सर्वच रस्त्यांची कामे केली जातील, असे घुगे-पाटील यांनी सांगितले.