जळगाव - सीसीआयकडून कापूस खरेदीला आता सुरुवात होणार आहे. यंदा शेतकऱ्यांकडून मालखरेदी करण्यासाठी सीसीआय किंवा बाजार समितीने कोणतीही स्वतंत्र व्यवस्था न केल्याने थेट सीसीआयच्या केंद्रावर माल खरेदी केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला असून, या प्रक्रियेत जिनर्सकडून मात्र व्यापाऱ्यांच्याच मालाला प्राधान्य देण्यात येऊ नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी १५ ऑक्टोबरपासून सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात होत असते. मात्र, यावर्षी कापसातील ओलाव्याचे कारण देत सीसीआयने एक महिना उशिराने खरेदी केंद्र सुरू केले आहे. बाजार समितीने यावर्षी १५ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु केली होती. मात्र, या नोंदणीत अनेकवेळा व्यापाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात असल्याने, खासदार उन्मेष पाटील यांनी बाजार समितीत नोंदणी न करता शेतकऱ्यांसाठी अॅप तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बाजार समितीमधील नोंदणी प्रक्रिया थांबवून नोंदणीसाठी अॅप तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, महिनाभरात जिल्हा प्रशासनाने कोणतेही अॅप विकसित न केल्याने आता थेट सीसीआयच्या केंद्रावर शेतकरी आपला मालविक्री करू शकतील.
गर्दी वाढल्यास नोंदणी प्रक्रिया सुरु होईल-
सध्या भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव याठिकाणी सीसीआयचे केंद्र सुरु आहेत. सोमवारपासून जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे दोन केंद्र सुरु होणार आहेत. नोंदणी नसल्याने थेट माल खरेदी केला जाणार आहे. मात्र, शेतकऱ्यांची गर्दी वाढल्यास नोंदणी प्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणताना सोबत सात-बाराचा उतारा व आधारकार्ड आवश्यक राहणार आहे.
व्यापारी-जिनर्सची मिलीभगत झाल्यास शेतकऱ्याचे नुकसान-
गेल्या काही वर्षांची परिस्थिती पाहिल्यास सीसीआयच्या माल खरेदी करण्याआधी व्यापारीवर्गांकडून खरेदीला सुरुवात होत असते. सुरुवातीला भाव नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा तब्बल १ ते दीड हजार एवढ्या कमी दरात माल खरेदी करतात. त्यानंतर सीसीआयचे केंद्र सुरू झाल्यानंतर जिनर्ससोबत हातमिळवणी करून हाच माल शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी हमीभावाच्या किमतीत विकतात. तसेच जिनर्स देखील शेतकऱ्यांच्या मालाऐवजी व्यापाऱ्यांच्या मालाला प्राधान्य देत असल्याचे चित्र काही वर्षांपासून दिसत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून, या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा- सिरीयल किलर रामन राघव याला अटक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू