जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत उसळलेल्या गर्दीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन दिवसांनी हा गुन्हा दाखल झाला.
नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलीस प्रशासनाने दाखल केला गुन्हा -
हाजी गफ्फार मलिक यांचे 24 मे रोजी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर 25 रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. त्यात गफ्फार मलिक यांचे पूत्र एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गिरीश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
मोठ्या प्रमाणावर उसळली होती गर्दी-
गफ्फार मलिक यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर कोरोनाचे नियम पाळून अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने केल्या होत्या. मात्र, तरीही अंत्ययात्रेला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. मलिक यांची अंत्ययात्रा काट्याफाईल भागातून निघाली होती. गर्दी जास्त असल्याने सुभाष चौकापासून पोलिसांनी अंत्ययात्रा वाहनाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत इदगाह मैदानावर नेली. सुभाष चौकातून नागरिकांना परत जाण्याची विनंती करण्यात आली होती.