जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पहिला भाग उमेदवारांची बदला-बदल, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे झालेल्या हाणामाऱ्यामुळे चांगलाच गाजला. त्यानंतर आता दुसऱ्या भागात उमेदवारांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने जोर चढलाय. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीमुळे, प्रथमदर्शनी तिरंगी लढत दिसत असली तरी खरी चुरस मात्र, भाजपचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांच्यातच होणार आहे. गुलाबराव देवकरांनी ग्रामीण भागात तर उन्मेष पाटलांनी शहरी भागावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लागलीच जळगावच्या उमेदवारीची माळ माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या गळ्यात टाकली. दुसरीकडं भाजप मात्र उमेदवार निश्चितीत पिछाडीवर राहिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने विधानपरिषदेच्या सदस्या स्मिता वाघ यांची उमेदवारी मागे घेत ऐनवेळी उन्मेष पाटलांना पुढे केले. तोपर्यंत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा अर्धा मतदारसंघ पिंजून झाला होता.
मतदारसंघाचा चेहरामोहरा तर बदलावा-
प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकरांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यातही कायम आहे. अगदी शेवटच्या क्षणी भाजपकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झालेल्या उन्मेष पाटलांकडे प्रचाराला खूप कमी कालावधी शिल्लक राहिला आहेअसल्यानं त्यांनी आपला मोर्चा थेट शहरी भागाकडे वळवल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात २३ एप्रिलला मतदान होणार आहे. आता अवघे चारच दिवस उरल्यानं प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराने आपल्या मतदारसंघाचा चेहरामोहरा तर बदलावा; शिवाय शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.
लोकसभेची निवडणूक म्हणजे देशपातळीवरील नेतृत्त्व ठरवणारी निवडणूक मानली जाते. त्यामुळं या निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांची नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना दिसते. राज्यांसह देश पातळीवर सध्या हेच चित्र दिसत असलं तरी जळगावात मात्र तसं चित्र नाही. प्रमुख लढत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा प्रलंबित असलेल्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासह मतदारसंघाचा विकास करण्याची आश्वासने दिली जाताहेत. बेरोजगारांच्या हाताला काम, शेतीसाठी सिंचन व्यवस्था, कृषीपूरक उद्योग व व्यवसाय, दळणवळण आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी आहेत.
जळगावात पाच दिवसांनंतर मतदान होणार आहे. त्यामुळे शेवटच्या घटकातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची धडपड सुरू आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सकाळी लवकर प्रचाराला सुरुवात होत असून दुपारी विश्रांती तर सायंकाळी पुन्हा प्रचार करण्यावर भर दिला जातो. एकंदरीत, जळगावात लोकसभा निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने तापले असून कोणाचा प्रचार फळास येतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.