जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भंगारात एक ब्रिटिशकालीन उपकरण सापडले आहे. या उपकरणात गरम पाण्याच्या वाफेकर शस्त्रक्रियेची साधने निर्जंतुकीकरण करण्याची व्यवस्था आहे. आता हे उपकरण जीर्ण झालेले असल्यान रुग्णालय प्रशासनाने त्याला रंगरंगोटी केली. हे उपकरण रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात ठेवण्यात आले असून, 'अँटिक पीस' म्हणून ते परिसराची शोभा वाढवत आहे.
असे आहे दुर्मिळ अन् ऐतिहासिक उपकरण -
शासकीय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालयातील भंगार साहित्य काढण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. याच भंगारामध्ये हे दुर्मिळ आणि ऐतिहासिक असे उपकरण आढळून आले. या उपकरणाची निर्मिती ही अमेरिकन कंपनी मार्शल अँड सन्स हिने 1936 मध्ये केलेली आहे. या उपकरणाची रचना अतिशय वैविध्यपूर्ण असून ते अभियांत्रिकीचा उत्तम नमुना आहे. हे उपकरण दोन भागात बनवलेले आहे. एका भागात पाण्याची आडवी लोखंडी टाकी असून, तिच्याखाली लाकडे जाळण्याची व्यवस्था आहे. या टाकीतील गरम पाण्याची वाफ पाईपलाईनद्वारे दुसऱ्या भागातील टाकीत सोडण्याची व्यवस्था आहे. या टाकीत शस्त्रक्रियेची साधने निर्जंतुकीकरण करण्यासाठी ठेवली जात असत. पूर्वीच्या काळी वीज नव्हती. म्हणून शस्त्रक्रियेची साधने निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे उपकरण वापरले जात असल्याची माहिती मिळाली.
विद्यार्थ्यांना होईल माहिती -
हे उपकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने 'अँटिक पीस' म्हणून दिव्यांग वॉर्डच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ठेवले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या तंत्रज्ञानाची माहिती होणार आहे. या उपकरणाच्या बाजूला त्याची माहिती देणारा फलक देखील लवकरच लावला जाणार असल्याची माहिती डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.
परिसराची वाढली शोभा -
ज्या पद्धतीने आयुध निर्मिती कारखाने, विमानतळ, रेल्वेस्थानकावर रणगाडे, विमाने तसेच रेल्वेचे इंजिन अँटिक पीस म्हणून दर्शनी भागात लावली जातात, त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयात हे उपकरण दर्शनी भागात लावण्यात आले आहे. यामुळे रुग्णालय परिसराची शोभा वाढली आहे.