जळगाव - पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे एका शेतकऱ्याचा कापसाचे वजन करताना एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोजमाप करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली. तसेच या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यासह मापाडी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
संतप्त शेतकऱ्यांनी दिला चोप-
अधिक माहिती अशी की, व्यापारी लहू धुडकू पाटील (रा. मोंढाळे प्र.उ. ता. पारोळा) आणि संजय दशरथ वाणी (रा. डी.डी. नगर पारोळा) यांना शेतकरी विलास पाटील यांनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे 5 हजार 200 रुपये क्विंटल दराने कापूस दिला होता. या कापसाचे विक्रीवेळ वजन करत असताना मोजमाप करणारा कर्मचारी रावण त्र्यंबक पाटील (रा. दळवेल ता पारोळा) हा मोजमाप करीत होता. मापाडी मोजमाप करीत असताना चलाखी केल्याचे निदर्शनास आले.
शेतकऱ्यांनी 22 वा तोल मोजल्यावर तो परत मोजण्याचा आग्रह धरला असता. सुरपवातीला मापाडीने ते वजन करण्यास नकार दिला. त्यावेळी उपस्थित इतर शेतकऱ्यांनी तेच वजन परत करण्यास भाग पाडले. त्यावेळी सुरुवातीला 40 किलो भरलेले वजन नंतर मोजणीत 42 किलो भरले. त्यामुळे सरासरी प्रति क्विंटल 5 किलो म्हणजे 260 रुपये किंमतीचा कापूस व्यापारी जास्त घेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि संतापलेल्या शेतकऱ्यांनी व्यापारी, मापाडी यांना चोप दिला.
व्यापारी व मापाडी विरुद्ध गुन्हा दाखल-
यापूर्वी याच व्यापाऱ्यांनी इतर शेतकऱ्यांची कापूस मोजला असल्याने ते शेतकरी या ठिकाणी धडकून व्यापाऱ्यांना जाब विचारू लागले. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याने पोलीस ही त्या ठिकाणी दाखल झाले. शेतकरी विलास पाटील यांच्या तक्रारीवरून दोघा व्यापारी आणि मापाडी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.