जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या बोरखेडा येथे घडलेल्या चार आदिवासी बालकांच्या हत्याकांडातील संशयितांच्या वयाची निश्चिती करण्यासाठी त्यांच्या हाडांची चाचणी होणार आहे. या वैद्यकीय तपासणीचा अहवाल लवकर येणे अपेक्षित आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.
डॉ. प्रवीण मुंडे पुढे बोलतांना म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, सर्वच बाबींची पडताळणी करून भक्कम पुरावे गोळा करण्यात येत आहेत. त्यानंतरच संशयितांना अटक करण्यात येणार आहे. पोलिसांचा तपास योग्य आणि सकारात्मक दिशेने सुरू असून, शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही संशयितांच्या वयाचे लिखित पुरावे उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या हाडांची चाचणी करून वैद्यकीय तपासणीच्या आधारे त्यांचे वय निश्चित केले जाणार आहे.
दरम्यान पीडित कुटुंबाला दोन लाख रुपयांचा धनादेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या परिवाराला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदिवासी विभागामार्फत मदत देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मदत करण्यात आली आहे. तसेच त्यांना तहसील कार्यालयामार्फत रेशनकार्डही देण्यात आले आहे.