जळगाव - कोरोना विषाणूच्या भीतीमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांचा हँड सॅनिटायझर तसेच मास्क वापराकडे कल वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून हँड सॅनिटायझर तसेच मास्कची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे जळगावात हँड सॅनिटायझरसह मास्कचा काळाबाजार सुरू झाला आहे. काही मेडिकल व्यावसायिक अव्वाच्या सव्वा दराने हँड सॅनिटायझर आणि मास्कची विक्री करत आहेत. प्रशासनाने असे गैरप्रकार करणाऱ्या मेडिकल व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हात चांगल्या प्रतीच्या हँड सॅनिटायझरने धुवावेत, घराबाहेर पडताना तोंडाला मास्क बांधावे, अशा प्राथमिक उपाययोजना करणे गरजेचे आहे. याच कारणामुळे हँड सॅनिटायझर तसेच मास्क वापराकडे लोकांचा कल वाढला आहे. अचानक मागणी वाढल्याने हँड सॅनिटायझर तसेच मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात काळाबाजार सुरू झाला आहे.
काही मेडिकल व्यावसायिक चढ्या दराने हँड सॅनिटायझर आणि मास्क विक्री करत आहेत. तातडीची गरज म्हणून नागरिक देखील वाढीव दरात खरेदी करत आहेत. काही दिवसांपूर्वी 20 ते 25 रुपयांना मिळणारे मास्क आता 60 ते 80 रुपयांपर्यंत विक्री होत आहे. त्याचप्रमाणे नामांकित कंपनीचे हँड सॅनिटायझर तर मिळतच नसून त्याऐवजी दुसऱ्याच कंपनीचे सॅनिटायझर वाढीव किंमतीत ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. चांगल्या दर्जाचे सॅनिटायझर कुठले? असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांना पडला आहे. पॉकेट हँड सॅनिटायझरला विशेष मागणी आहे. त्यामुळे पॉकेट हँड सॅनिटायझरचा सर्वाधिक काळाबाजार सुरू आहे. दीडशे ते दोनशे रुपयांना पॉकेट हँड सॅनिटायझर विकले जात आहे. हँड सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काळाबाजार वाढला आहे.
या विषयासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी होऊ लागल्याने जळगाव जिल्हा मेडिकल डीलर असोसिएशनने घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांची बैठक घेऊन हँड सॅनिटायझर तसेच मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. मात्र, तरीही काळाबाजार सुरू असल्याने याप्रश्नी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
दरम्यान, सद्यस्थितीत हँड सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. त्याची विक्री एमआरपीपेक्षा अधिक दराने करणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार कोणीही करत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिला. असा प्रकार सुरू असेल तर नागरिकांनी न घाबरता प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.