जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने सुरू आहे. मृत्यूदर देखील आटोक्यात येत नाही. अशा परिस्थितीत नुसत्या आढावा बैठका घेऊन काय उपयोग? राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन याकामी अपयशी ठरले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी यापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत सूचवलेल्या उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. उपाययोजनाच होत नसल्याने रुग्ण मरतात. मग, आढावा बैठकांमध्ये फक्त कीर्तन करायचे का? अशा शब्दात भाजप आमदारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीत आपला संताप व्यक्त केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी दुपारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासनातर्फे केल्या जाणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना, भविष्यातील नियोजन यासारख्या विषयांवर चर्चा झाली. स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत भाजप आमदारांनी पालकमंत्र्यांना लक्ष केले. बैठकीच्या सुरुवातीला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १२ व्हेंटिलेटर्स आहेत. मंगळवारपर्यंत अजून ३४ व्हेंटिलेटर्स येणार आहेत. जुलै अखेरपर्यंत पूर्ण ६८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
याच मुद्यावरून माजीमंत्री गिरीश महाजन आणि खासदार उन्मेष पाटील आक्रमक झाले. आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत व्हेंटिलेटर्स खरेदीच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मग त्यासाठी एवढा वेळ का लागला? अद्याप व्हेंटिलेटर का उपलब्ध झाले नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोविडपेक्षाही नॉन कोविड रुग्णांचे मृत्यू जास्त होत आहेत. माणसे मरत आहेत. तरीही प्रशासन हातावर हात धरून का बसले आहे, असा सवाल गिरीश महाजन यांनी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. आमदार मंगेश चव्हाण यांनीही गेल्या बैठकीत काय उपाययोजना करायचे ठरले होते ? त्यावर काय कारवाई केली ? अशी विचारणा करत आढावा बैठकांमध्ये केवळ हरिपाठ व कीर्तन होते. कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. मग बैठकांचा फार्स कशाला? अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
पालकमंत्र्यांनी टोचले आमदार भोळेंचे कान
आमदार सुरेश भोळे यांनी कोविड रुग्णांसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांच्या निधीबाबत विचारणा करताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना मधेच थांबवले. महापालिकेत तुमचीच सत्ता आहे. सत्ता तुमच्याकडे असताना तुमच्याच सभापती तीन-तीन वेळा टेंडर रद्द करतात. त्यात आम्ही काय करणार, अशा शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार भोळे यांना टोला लगावत निरुत्तर केले.
उपाययोजनांच्या मुद्यावरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपली
कोरोनाच्या उपाययोजनांच्या मुद्यावरून आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. माजीमंत्री गिरीश महाजन यांनी कोरोनाच्या नियंत्रणात राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप केला. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र, महाजन यांचे आरोप खोडून काढत, राज्य सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. परंतु, विरोधकांना त्या दिसत नाहीत. कोणत्याही गोष्टीला विरोध करणे हे विरोधकांचे कामच असते. विरोध केला नाही तर विरोधकांना महत्त्व उरणार नाही, असा टोला देखील पाटील यांनी महाजन यांना यावेळी लगावला.
बैठकीत झालेले महत्त्वपूर्ण निर्णय
१५ दिवसात जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आढावा घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नॉन कोविड रुग्णालय केले जाईल. तर डॉ. उल्हास पाटील रुग्णालय १०० टक्के कोविड रुग्णालय केले जाईल.
बैठकीत सर्वच आमदारांनी तालुक्यांमधील बेडची संख्या वाढविण्याची मागणी केली. त्यावर तातडीने निर्णय घेणार असल्याची पालकमंत्र्यांची ग्वाही.
कोविडची लक्षणे दिसत नसलेल्या मात्र, कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी मागणी केल्यास प्रत्येक तालुक्यात पेड तत्त्वावर हॉटेलची व्यवस्था करणार.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरणार.
मंजूर निधीतून कोविड उपाययोजनांसाठी साहित्य खरेदी तातडीने करणार.
जिल्ह्यातील मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी उपाययोजना करणार.