जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपसमोर नाराजीचे एकामागून एक संकट पुढे येऊन ठाकत आहे. चाळीसगावचे भाजप आमदार तसेच जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांना मतदान करू नका, असे सांगत बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे शालक चित्रसेन पाटील यांनी उन्मेष पाटील यांना विरोध केला आहे. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्या वाटेत स्वतःच्या मतदारसंघातच अडचण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
चित्रसेन पाटील यांनी उन्मेष पाटील यांच्या विरोधात मोट बांधली आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी चाळीसगावात पत्रकार परिषद घेतली. चाळीसगाव तालुक्यातून उन्मेष पाटील हे ५० हजार मतांनी मागे राहतील, असा दावा करत चित्रसेन पाटील यांनी भाजपविरुद्ध प्रचार करत एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला उघड उघड मदत केल्याचे बोलले जात आहे. आमदार उन्मेष पाटील हे भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप करीत भाजपश्रेष्ठींना याबाबत माहिती नसेल का? असाही सवाल देखील चित्रसेन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
२०१४ च्या निवडणुकीत ज्या बेलगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कळीच्या मुद्दयावर उन्मेष पाटील चाळीसगावचे आमदार म्हणून निवडून आले. तो साखर कारखाना सुरू होऊ नये, यासाठी उन्मेष पाटील यांनी आमदार झाल्यावर द्वेषाचे राजकारण केले. यामुळे तालुक्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उन्मेष पाटील यांना मतदान करताना जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेने चाळीसगाव तालुक्यातील त्यांच्या नातेवाईकांना विचारावे की, उन्मेष पाटलांना मतदान करावे की नाही? असेही चित्रसेन पाटील म्हणाले.
उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीने आधीच भाजपमधील एक गट नाराज झाला आहे. त्यात आता चित्रसेन पाटील यांनी आपला विरोध दर्शवून उन्मेष पाटलांना स्वतःच्या मतदारसंघात खिंडीत गाठले आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे निश्चितच परिणाम करणारी ठरतील, असा राजकीय जाणकारांचा दावा आहे.