जळगाव - विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बहुप्रतिक्षित उमेदवारांची पहिली यादी आज (मंगळवारी) दुपारी जाहीर करण्यात आली. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले तीन वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -भाजपने राणेंना गंडवले का? आता काय करणार राणे?
मुक्ताईनगर मतदारसंघातून 1990 पासून खडसे सलग सहा वेळा निवडून आले. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर 2014 च्या निवडणुकीत ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात त्यांच्याकडे महसूलसह अनेक प्रमुख खाती सोपविण्यात आली होती. मात्र, फडणवीस आणि त्यांच्यात वाद वाढत गेला. भोसरी येथील एका जमीन व्यवहाराच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पक्षात पुनर्वसनाची मागणी अनेकदा केली.
हेही वाचा - ईव्हीएमवर शंका घेत काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची निवडणुकीतून माघार
मात्र, पक्षश्रेष्ठींनी त्यांना बाजूलाच ठेवले. त्यांच्या सुनेला लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्या खासदार झाल्या. जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात खडसे यांनी भाजप वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत या जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना पक्षाकडून महत्त्व देण्यात आले. आता खडसे यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीतून डावलल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पक्षश्रेष्ठींशी बोलणार- एकनाथ खडसे
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांनी एकनाथ खडसेंना पहिल्या यादीत नाव वगळल्याबाबत विचारणा केली असता, खडसे म्हणाले, पहिल्या यादीत माझे नाव आहे किंवा नाही, याबाबत मला माहिती नाही. मात्र, पहिल्या यादीत नाव नसेल तर दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या यादीत नाव का नाही, याबाबत मी पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. मी आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, एवढे बोलून खडसेंनी काढता पाय घेतला.
हेही वाचा - ...म्हणूनच आदित्य ठाकरेंनी निवडला वरळी मतदारसंघ?
खडसेंचा पत्ता कापला गेल्याची चर्चा -
भाजपच्या पहिल्या यादीत खडसेंच्या नावाचा समावेश नसल्याने खडसेंचा पत्ता कापला गेल्याची चर्चा आहे. पहिल्या यादीत जळगाव शहरातून विद्यमान आमदार सुरेश भोळे, भुसावळमधून विद्यमान आमदार संजय सावकारे, जामनेर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमळनेर शिरीष चौधरी, रावेर हरिभाऊ जावळे तर चाळीसगावमधून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप सेनेत युतीचा सहा-पाच असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. असे असेल तर भाजपच्या सहा मतदारसंघात उमेदवार जाहीर झाले असून खडसे यांचा पत्ता कापल्याचे स्पष्ट झाले आहे. मुक्ताईनगर हा मतदारसंघ युतीच्या नव्या फॉर्म्युल्यात सेनेला सुटल्याचे संकेत मिळाले आहेत. येथून सेनेकडून चंद्रकांत पाटील उमेदवार असतील.