जळगाव - लॉकडाऊनच्या काळात सर्व नियम धाब्यावर बसवून जळगावातील एका भाजप नगरसेवकाने पोलीस कर्मचारी तसेच काही वाळुमाफियांसोबत शेतात ओली पार्टी केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मद्याचे 'पॅक' रिचवत असताना या सर्वांनी 'रमी'चा डावही मांडला होता. या प्रकाराची कुणकुण लागताच पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली. या चौकशीचा अहवाल सोमवारी पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आला असून, अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊनच्या काळात असलेली मद्यविक्री बंदी, जमावबंदी तसेच सोशल डिस्टन्सिंग हे सर्व नियम झुगारून शहरातील भाजप नगरसेवक कुलभूषण पाटील, पोलीस कर्मचारी विनोद चौधरी याच्यासह 7 वाळुमाफियांनी 21 एप्रिलला शहरालगत मोहाडी शिवारातील एका शेतात ओली पार्टी केली होती. शेतात मद्य रिचवत जुगार खेळत असलेल्या या नवाबी पार्टीचे काही फोटो 23 एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही बाब प्रसारमाध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. त्यांनी तत्काळ या प्रकरणाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्यावर जबाबदारी सोपवली होती.
पोलीस निरीक्षक हिरे यांनी 25 एप्रिलला पार्टीत सहभागी असलेल्यांना जबाब घेण्यासाठी बोलावले होते. याच दिवशी हिरे यांनी पार्टीत हजर असलेल्या काहींना स्पॉट व्हेरीफिकेशनसाठी थेट मोहाडीच्या शेतातही नेले होते. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर तसा अहवाल तयार करुन त्यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना सुपूर्द केला आहे. आता अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस कर्मचाऱ्याची कारकीर्द वादग्रस्त-
लॉकडाऊन असताना पार्टी करणाऱ्यांनी मद्य कोठून आणले? कोणत्या उद्देशाने पार्टीचे आयोजन केले होते? या संदर्भातील संपूर्ण माहिती आता पोलिसांच्या समोर आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई अटळ मानली जात आहे. दरम्यान, या पार्टीत सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वीही त्याच्यावर एका वाळू व्यावसायिकाचा वाढदिवस वाहतूक शाखेच्या कार्यालयात साजरा केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. सध्या तो मुख्यालयात कार्यरत आहे. आता पुन्हा तो अडचणीत सापडला आहे.