जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या निंबोल येथील विजया बँकेच्या शाखेत सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न झाल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेचे उपव्यवस्थापक करणसिंग नेगी ठार झाले. दुःखद बाब म्हणजे, दोन महिन्यांनी नेगी यांचे लग्न होणार होते. त्यापूर्वीच नेगी दरोडेखोरांचे सावज ठरले. या दुर्दैवी घटनेमुळे नेगी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
करणसिंग नेगी हे मूळचे हिमाचल प्रदेशातील रहिवासी होते. विजया बँकेत नोकरीला लागल्यानंतर ते दोन वर्षांपूर्वी उपव्यवस्थापक म्हणून निंबोल शाखेत रुजू झाले होते. निंबोल गावातच ते भाड्याने घर घेऊन राहत होते. दोन महिन्यानंतर त्यांचे लग्न होणार होते. लग्नानंतर ते हिमाचल प्रदेशात बदली करून घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.
खाली वाकल्याने बचावलो; रोखपालाने सांगितली आपबिती -
या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले बँकेतील रोखपाल महेंद्रसिंग राजपूत यांनी आपबिती कथन केली. नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील बँकेचे कामकाज सुरू होते. दुपारी साधारणपणे सव्वा दोन वाजताच्या सुमारास हेल्मेट घातलेले दोन दरोडेखोर सुरक्षारक्षकाची नजर चुकवून बँकेत दाखल झाले. त्यापैकी एक जण सरळ काचेच्या मुख्य काउंटरवर असलेले उपव्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्याजवळ गेला. नेगी यांच्यावर हातातील पिस्तूल रोखून त्याने पैशांची मागणी केली. मात्र, नेगी यांनी त्याला विरोध करत सुरक्षा अलार्म वाजण्याचा प्रयत्न केला. हे पाहून दरोडेखोराने काउंटरवरून आत उडी मारत नेगी यांच्यावर पिस्तूलमधून 2 गोळ्या झाडल्या.
गोळीबार होताच मागे असलेला दुसरा दरोडेखोर देखील त्याच्याजवळ आला. मी कॅश काउंटरवर होतो. माझ्याकडे पाहून दुसऱ्या दरोडेखोराने माझ्या दिशेने गोळी झाडली. मात्र, सुदैवाने मी वेळीच खाली वाकल्याने बचावलो. त्याचवेळी बँकेतील कोणीतरी सुरक्षा अलार्म वाजवल्याने दरोडेखोर घाबरून बँकेबाहेर पळाले. त्यानंतर काही नागरिक बँकेत धावत आले. त्यांनी जखमी झालेल्या नेगी यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले, असे महेंद्रसिंग राजपूत यांनी या थरारक घटनेविषयी सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट -
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच घटनेच्या प्रत्यक्षदर्शी ग्राहकांचे जबाब नोंदविण्यात आले. पोलिसांनी तातडीने बँकेतील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. मात्र, दरोडेखोरांनी हेल्मेट घातलेले असल्याने त्यांच्या पेहरावा व्यतिरिक्त फारशी माहिती होऊ शकली नाही. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने बँकेत चौकशी करून काही नमुने घेतले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ जिल्हाभरात नाकाबंदी केली आहे. ही घटना घडल्यानंतर रावेर तालुक्यातील इंटरनेट सेवा देखील काही काळ बंद करण्यात आली होती.