जळगाव - जिल्ह्यातील मुक्ताईनगर वनक्षेत्रात बिबट्याचा वावर असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात असलेल्या कुऱ्हाकाकोडा शिवारातील एका उसाच्या शेतात बिबट्याची 3 पिल्ले आढळून आली आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, तिन्ही पिल्लांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
एका उसाच्या शेतात बिबट्याची 3 पिल्ले असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. पिल्ले पाहताच शेतकऱ्यांनी गावाकडे धूम ठोकली. पिल्लांसोबत मादी बिबट देखील असावी, या भीतीने कुणीही शेताकडे जायला तयार नव्हते. या घटनेची माहिती मुक्ताईनगर वनविभागाला कळवण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कुऱ्हाकाकोडा येथे आले. ग्रामस्थांना सोबत घेऊन ते उसाच्या शेतात आले. मादी बिबट शेतात नसल्याची खात्री झाल्यानंतर तिन्ही पिल्ले ताब्यात घेण्यात आली.
हेही वाचा - अखेर 'तो' बिबट्या जेरबंद...
मुक्ताईनगर वनक्षेत्रात बिबट्याचे अस्तित्त्व आहे. अनेकदा बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी तसेच शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा बिबट्याची पिल्ले आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी तसेच दिवसा एकटे शेतात जाऊ नये, शेतात जाताना काठी किंवा फटाके सोबत ठेवावेत, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.