जळगाव - राज्यात ऑटो रिक्षाला मीटर असणे सक्तीचे असताना जळगावात अजूनही या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. रिक्षाचालक मीटर लावण्यासाठी तयार आहेत. मात्र, आधी शहरातील रस्ते सुधारावेत, मग मीटर पद्धत उपप्रादेशिक परिवहन विभागाने अंमलात आणावी, असा पवित्रा रिक्षाचालकांनी घेतला आहे.
जळगाव शहरात २ हजाराहून अधिक ऑटो रिक्षा आहेत. या सर्व ऑटो रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मीटर असणे सक्तीचे आहे. मात्र, याबाबत अजूनही अंमलबजावणी रखडली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विषयासंदर्भात ऑटो रिक्षा चालक संघटनांच्या सदस्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही. त्यामुळे ऑटो रिक्षामधील मीटरचा विषय प्रलंबित आहे. ऑटो रिक्षा चालक आणि प्रवासी अजूनही मीटर पद्धतीचा अवलंब करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
बहुसंख्य ऑटो रिक्षाचालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवले आहेत. मात्र, शहरातील रस्ते खराब असल्याने या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याची ऑटो रिक्षाचालकांची तक्रार आहे. त्यामुळे ऑटो रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये मीटरप्रमाणे भाडे आकारण्याच्या विषयावरून वाद होतात. ही परिस्थिती लक्षात घेता, आधी शहरातील रस्ते दुरुस्त करावेत, त्यानंतर मीटरची अंमलबजावणी करावी, अशी ऑटोरिक्षा चालकांची मागणी आहे. काही सामाजिक संघटनांकडूनदेखील शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी म्हणून मीटर प्रमाणे भाडे आकारणीची मागणी होत आहे.
जळगाव शहरात काही वर्षांपूर्वी ऑटो रिक्षांमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीटरप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारण्याची पद्धत सुरू झाली होती. मात्र, यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होण्याचे प्रकार वाढले होते. ही परिस्थिती लक्षात घेता ऑटो रिक्षा चालकांनी मीटर पद्धतीने भाडे आकारणे बंद केले होते. आता पुन्हा हा विषय पुढे आला आहे. मात्र, यावेळी रिक्षा चालकांकडून शहरातील खराब रस्त्यांचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाने मात्र, मीटर पद्धत सक्तीची असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उपप्रादेशिक परिवहन विभाग व रिक्षाचालक संघटनांमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.