जळगाव - भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियानाच्या प्रदेश सदस्या प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अस्मिता पाटील गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात नाराज होत्या. याच नाराजीतून त्यांनी भाजपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्या आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी 10 डिसेंबर रोजीच भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु, पक्षाने याबाबत कुठेही वाच्यता केलेली नाही. पक्षात राहून कार्य करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्या पक्षावर नाराज होत्या, असे बोलले जात आहे. अस्मिता पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी राजकीय भूमिकेकडे लक्ष
राष्ट्रवादीत असताना 2014मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. पाचोरा तालुक्याच्या राजकारणात त्या सक्रिय होत्या. त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने आता त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
विधानसभा, लोकसभेला पदरी आली निराशा
अस्मिता पाटील या पाचोरा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या तिकिटासाठी तर लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातूनही खासदारकीसाठी इच्छुक होत्या. मात्र, पक्षांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्या नाराज होत्या, असे बोलले जात आहे. विधानसभेपाठोपाठ लोकसभेलाही त्यांच्या पदरी निराशा आल्याने त्या गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त होत्या.
आमदार भोळेंकडून वृत्ताला दुजोरा
या विषयासंदर्भात आमदार सुरेश भोळे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी त्यांचा राजीनामा कार्यालयाकडे पाठवला आहे. परंतु, अद्याप त्यांच्याशी या विषयाबाबत प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही, असे आमदार भोळे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. तर अस्मिता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.