रावेर (जळगाव) - केळी पीकविम्याच्या अन्यायकारक निकषांकडे आज दुर्लक्ष केले तर आगामी तीन वर्षे हा अन्याय सहन करावा लागेल म्हणून बुधवारी (ता. २८) मुख्यमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीतील निर्णयाची वाट पाहून नंतर लगेच या विरोधात आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचा निर्णय येथील सर्वपक्षीय केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. येथील बाजार समितीच्यावतीने आयोजित या सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील होते. आमदार शिरीष चौधरी आणि आमदार चंद्रकांत पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांची या बैठकीत प्रमुख उपस्थिती होती.
पीकविम्याबाबत तोडगा निघाला नसल्याने या बैठकीचे आयोजन
राज्यभरातील सुमारे एक लाख केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या पीकविम्याबाबत अद्यापही तोडगा निघत नसल्याने पुढील दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत शेतकरी प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी सुरेश धनके यांनी सांगितले, की या प्रकरणी तातडीने सर्वपक्षीय शिष्टमंडळ न्यावे व सरकारने केळी पीकविम्यासाठी मुदत वाढवावी. माजी सभापती व संचालक राजीव पाटील म्हणाले, की या प्रकरणी रस्त्यावर उतरून संघटित होऊन आंदोलन करण्यास शेतकऱ्यांनी तयार राहावे. तांदलवाडी येथील युवा शेतकरी शशांक पाटील यांनी याप्रकरणी कृषी सचिव एकनाथ डवले यांची भूमिका संशयास्पद व नकारात्मक असल्याचा आरोप केला.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सरकारमधील वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती देतात, या वर्षी निकष बदलले जाण्याची शक्यता नाही, असे सांगून संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले, की या योजनेत केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान कमी झाल्यामुळे निकषात बदल झाले आहेत. मात्र, या प्रकरणी आपण शेतकऱ्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होण्यास तयार आहोत. आमदार चौधरी यांनी यासंदर्भात आतापर्यंत झालेल्या हालचालींचा सविस्तर आढावा घेऊन सांगितले, की या वर्षी निकष बदलले गेले नाहीत तरीही शेतकऱ्यांना ठोस मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तरीही न्याय न मिळाल्यास यासंदर्भात आंदोलनाची योग्य दिशा शेतकरी प्रतिनिधीने ठरवावी. त्यात आम्ही दोघे आमदार असलो तरी शेतकरी म्हणून सर्वांच्या पुढे असू. या प्रकरणी राजकीय ओढाताण करू नये, सर्वपक्षीय समिती तयार करून पुढील दिशा ठरवावी, असेही त्यांनी सांगितले.
या वेळी शेतकऱ्यांच्यावतीने सुनील कोंडे, विकास महाजन, डॉ. राजेंद्र पाटील, अमोल पाटील, रामदास पाटील, राहुल पाटील यांनीही आपली भूमिका मांडली. दीपक नगरे यांनी सूत्रसंचालन केले. पितांबर पाटील यांनी आभार मानले. बैठकीत माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, पंचायत समितीचे सभापती जितेंद्र पाटील, विनोद तराळ (अंतुर्ली), राजेश वानखेडे, पद्माकर महाजन, योगीराज पाटील, राजन लासूरकर, पी. आर. पाटील, प्रल्हाद पाटील, हरीश गनवाणी, डॉ. सुरेश पाटील, महेंद्र पाटील, महेश पाटील, एस. आर. पाटील यांच्यासह रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील सुमारे अडीचशे केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बैठक
आजच्या बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. मुंबईत बुधवारी (ता. २८) केळी पीकविम्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांची पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत केळी पीकविम्याबाबत काहीतरी योग्य तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तोडगा निघाला नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.