जळगाव - 'आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं, कैरी तुटनी खडक फुटना झुय-झुय पाणी व्हायवं, झुय-झुय पाणी व्हाये तठे बांगड्यासना बजार वं...' अशी अनेक अस्सल अहिराणी बोलीभाषेतील स्त्रीप्रधान लोकगीते खान्देशात अक्षय तृतीया अर्थात 'आखाजी' सणाला दारोदारी कानावर पडतात. खान्देशात आखाजी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरणदेखील केले जाते.
अक्षय तृतीया अर्थात आखाजी या सणाला लग्न झालेल्या मुली आपल्या माहेरी येतात. माहेरी आल्यानंतर त्या आपल्या मैत्रिणीमध्ये रमून गल्लीबोळात झोका बांधून आखाजीची लोकगीते गातात. पूर्वी चूल आणि मूल म्हणजेच घरचा उंबरठा आणि अगदीच झाले तर शेतीकामात महिलांचे जीवन गुरफटलेले होते. त्यामुळे स्त्रियांना माहेरची आठवण आणि सासरच्याचे वर्तन व्यक्त करण्याचे गायन किंवा काव्य या व्यतिरिक्त अन्य कुठलेही साधन नव्हते. त्यातूनच वर्षभरातील सणांना महिला आपल्या माहेरी येऊन लोकगीतांच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायच्या. खान्देशात आजही या आखाजी सणाला अहिराणी भाषेत म्हटल्या जाणाऱ्या अशा स्त्रीप्रधान गीतांच्या गायनाची परंपरा अखंडितपणे सुरु आहे.
आखाजी सणाला खान्देशात लेकींना मुराई म्हणजेच भावाला बहिणीला घेण्याकरता सासरी पाठवले जायचे. पूर्वापारची ही प्रथा आजही खान्देशात चालत आहे. लेक माहेरी आल्यानंतर तिचे मुक्तपणे कुटुंबात वावरणे, हे आखाजीच्या सणानिमित्त आजही तेवढेच प्रकर्षाने जाणवते. खान्देशातील ग्रामीण भागात गल्लोगल्लीत तुम्हाला सासुरवास विसरून महिला मुक्तपणे झोक्यावर एकमेकांसमोर झुलत, गाणे म्हणत स्त्री स्वातंत्र्याचा आनंद उपभोगताना नजरेस पडतात.
आखाजीला लेकीच्या आगमनाने कुटुंबात एक आगवेगळी चाहूल या सणानिमित्त लागते. आखाजीच्या आदल्या दिवशी कुंभाराकडून शंकर आणला जातो, गौराईची मांडणी केली जाते. धकाधकीच्या जीवनात ही प्रथा मागे पडली. तरी पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ घागर भरून पूजन करण्याची प्रथा मात्र खान्देशात आजही पाहावयास मिळते. लालमातीच्या घागरीवर डांगर, कुरडई, पापड ठेऊन पूजन करत वाडवडिलांचे स्मरण केले जाते. आखजीला पितरांची सेवा करण्याचा दिवस मानला जातो. दुपारी बारा वाजल्यानंतर पितरांना आंब्याचा रस तसेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पुरणपोळीचा सहकुटुंब आस्वाद घेतला जातो. आखाजीच्या दिवशी खानदेशातील प्रत्येक घराघरांत हे दृश्य पाहायला मिळते. माहेरी मोठ्या धामधुमीत आखाजीचा सण साजरी केल्यानंतर पंधरा दिवसांनी जेव्हा मुलगी सासरकडच्या मुराईसोबत परत जायला निघते तेव्हा संपूर्ण कौटुंबीक वातावरण भावनाविश्वात न्हावून जाते.