जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकले जात आहेत. या कारवाईचा निषेध करण्यासाठी, तसेच आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी मैदानात उतरली आहे. शहरातील बी. जे. मार्केटमध्ये असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाबाहेर 'भाजप प्राप्तिकर विभाग' असे बॅनर लावत राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाईचा निषेध नोंदवला.
भाजप सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप -
या आंदोलनात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नगराध्यक्षा मंगला पाटील, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, माजी नगरसेविका अश्विनी देशमुख यांच्यासह इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. आंदोलनाची भूमिका मांडतांना युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनी सांगितले की, 'भाजप सूडाचे राजकारण करत आहेत. सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभाग अशा केंद्रीय संस्थांना हाताशी धरून भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर सुरू असलेली प्राप्तिकर विभागाची कारवाई ही अशाच सूडाच्या राजकारणाचा एक भाग आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आहोत. भाजपने समाजहिताचे राजकारण करायला हवे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही', असेही कल्पिता पाटील यांनी सांगितले.
हे ही वाचा - चिपी विमानतळाचे उद्घाटन; नाव न घेता मुख्यमंत्री आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक
आम्हीही अजित दादांच्या भगिनी, आमच्यावर पण कारवाई करा -
भाजपने प्राप्तिकर विभागाला हाताशी धरून अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर छापे टाकले आहेत. अशा प्रकारचे राजकारण फक्त मुघलशाहीत होत असे. राष्ट्रवादी काँग्रेस हे एकसंघ कुटुंब आहे. आम्ही पण अजित पवारांच्या भगिनी असून प्राप्तिकर विभागाने आमच्यावर देखील धाडी टाकाव्यात, असे थेट आव्हानही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.
..अन्यथा जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही -
भाजपने आता सूडाचे राजकारण करणे बंद करायला हवे. जनता सर्व जाणून आहे. देशात कशा पद्धतीने चुकीचे राजकारण सुरू आहे, हे सर्वांनाच कळून चुकले आहे. भाजपने हे उद्योग आता बंद करावेत, अन्यथा जनता भाजपला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असेही आंदोलक महिलांनी यावेळी सांगितले.