जळगाव - महिनाभरापूर्वी शहरातील शिवकॉलनी उड्डाण पुलाजवळ असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम फोडून त्यातून 14 लाख 41 हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली होती. या घटनेतील दोन आरोपींना जळगावच्या जिल्हापेठ पोलिसांनी हरियाणातून अटक केली होती. या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस दोन्ही आरोपींना पुन्हा हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यासाठी गेलेले होते. मात्र, जिल्हापेठ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे दोघे आरोपी पळून गेले आहेत.
निसार शफुर सैफी (वय 38) आणि त्याचा भाऊ इरफान शफुर सैफी (वय 29) अशी पलायन करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दोघे हरियाणातील पलवल येथील रहिवासी आहेत. हरियाणात बदरपूर येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
जळगाव शहरातील शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ असलेले स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून त्यातून 14 लाख 41 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना 11 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती. 12 जुलैला ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी निसार सैफी व त्याचा भाऊ इरफान सैफी यांना हरियाणातून अटक केली होती. अटकेनंतर दोघांना जिल्हापेठ पोलिसांनी फरिदाबादमधील निमका कारागृहातून हस्तांतर करून 5 ऑगस्टला जळगावात आणले होते. तेव्हापासून ते पोलीस कोठडीत होते.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस दोघांना हरियाणातील निमका कारागृहात पोचण्यासाठी गेलेले होते. मंगळवारी सायंकाळी निमका कारागृहात दोघांना हजर करण्यासाठी गेले असता, तेथील प्रशासनाने आरोपींची कोरोनाची चाचणी करण्याचा सल्ला जिल्हापेठ पोलिसांना दिला. रात्रीच्या वेळी चाचणी करणे शक्य नसल्याने बुधवारी सकाळी चाचणी करण्याचा निर्णय घेऊन जिल्हापेठ पोलीस आरोपींना एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. रात्री त्याठिकाणी पोलीस आणि आरोपी एका खोलीत झोपले होते. मात्र, पहाटे उठल्यावर दोघे आरोपी तेथून पळून गेल्याचे लक्षात आले.
सूत्रधार राहिला दूर, हातात आलेले दोघे पळाले-
या प्रकरणात खुर्शिद मदारी सैफी (रा. अंघोला, ता. पलवल, हरियाणा) हा मुख्य सूत्रधार आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी जिल्हापेठ पोलीस हरियाणात गेलेले होते. परंतु, सूत्रधार दूर राहिला आणि हातात आलेले दोघे आरोपी जिल्हापेठ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच पळून गेले आहेत. नियमानुसार आरोपींना तेथील एखाद्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी चूक केल्याने आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली. दरम्यान, या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिले आहेत. याप्रकरणी हरियाणात गेलेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.