जळगाव - महामार्गावर गतिरोधकामुळे दुचाकीची गती कमी करताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिची 4 वर्षांची नात गंभीर जखमी झाली आहे. महिलेचा पती देखील किरकोळ जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजता जळगाव-भुसावळ महामार्गावर कालिंका माता मंदिरासमोर हा अपघात झाला. जळगावात दीड महिन्यानंतर महामार्गावर हा दुर्दैवी अपघात घडला.
जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी वसीम खान (वय ४३) पत्नी रेहानाबी (वय ३८) तसेच 4 वर्षीय नात सामिया हिला साेबत घेऊन दुचाकीवरून (एमएच १९ बीटी ९९७१) धान्य घेण्यासाठी घरातून निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर अजिंठा चौफुलीकडून कालिंका माता मंदिर चौकात दुचाकी आली असताना गतिरोधकावर त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच १५ ईजी ७८५७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात खान दाम्पत्य दुचाकीवरुन फेकले गेले. चालक वसीम खान दुचाकीसह एका बाजूला तर, पत्नी रेहानाबी नातीसह रस्त्यावर पडल्या. यावेळी ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने जागेवर त्यांचा मृत्यू झाला. तर सामियाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
या अपघातानंतर नागरिकांनी लागलीच जखमी सामिया हिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, गोविंदा पाटील, असीम तडवी, निलेश पाटील, मुदस्सर काझी, भूषण सोनार यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक व चालक फिराेज शहा कालु शहा (वय ३७, रा. रचना कॉलनी) याला ताब्यात घेतले. हा ट्रक नशिराबाद येथे सिमेंट फॅक्टरीत जात होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मृत रेहानाबी महापालिका कर्मचारी -
या अपघातातील मृत रेहानाबी या महापालिका कर्मचारी होत्या. अनुकंप तत्त्वावर त्या नोकरीस लागल्या होत्या. अतिक्रमण विभागात नेमणुकीस असलेल्या रेहानाबी मेहनती होत्या. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत मदतकार्य केले.