जळगाव - भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीची नोटीस बजावली आहे. मात्र, खडसेंनी सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी आपल्याला कोरोना झाल्याचा बनाव केला आहे, असा खळबळजनक आरोप जळगावातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी केला आहे.
शिवराम पाटील यांनी शनिवारी (दि. 2 जाने.) सायंकाळी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी)ची काही कागदपत्रे सादर करत खडसेंनी बनावट कोरोना अहवाल तयार केल्याचा दावा केला. दरम्यान, पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले शिवराम पाटील?
शिवराम पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी कोरोना झाल्याचे सांगितले आहे. पण, ते 28 पासून 30 डिसेंबर दरम्यान मुंबईत होते. त्यांनी 28 डिसेंबरला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी चर्चा केल्याचे सोशल मीडियावर वृत्त आले आहे. मग खडसेंनी कोरोना चाचणीसाठी 29 डिसेंबरला घशाचे स्त्राव कसे आणि केव्हा दिले? त्यांचा कोरोनाचा अहवाल 30 डिसेंबरला पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुक्ताईनगर आणि जळगाव जिल्हा रुग्णालय अशा दोन्ही ठिकाणी एकाचवेळी स्त्राव कसे दिले. त्यांनी स्त्राव दिल्याबाबत जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीतील रजिस्टरमध्ये नोंद आहे. हे सारे संशयास्पद आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवराम पाटील यांनी केली.
तर मग मुख्यमंत्री ठाकरेंनी स्वतःची कोरोना चाचणी करावी
जर एकनाथ खडसे हे खरोखर कोरोनाग्रस्त असतील तर 28 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपली कोरोना चाचणी करायला हवी. खडसेंच्या कुटुंबीयांसह त्यांचे वाहन चालक, अंगरक्षक यांनाही क्वारंटाईन केले पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांच्या संपर्कातील लोकांना सक्तीने क्वारंटाईन केले जाते. मग राजकारण्यांना वेगळे नियम का?, असा सवालही शिवराम पाटील यांनी उपस्थित केला.
हेही वाचा - शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय भामट्यास अटक
हेही वाचा - जळगावातील पंप हाऊसचे काम अंतिम टप्प्यात