जळगाव - कोरोना बंदोबस्तासाठी मालेगावात गेलेल्या जळगावातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कर्मचाऱ्यास मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा कर्मचारी यावल पोलीस ठाण्यात कार्यरत असून जळगाव तालुक्यातील कानळदा येथील रहिवासी आहे. दरम्यान, बंदोबस्तासाठी गेलेल्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन काळजी घेत नसल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
जिल्हा पोलीस दलातील १०० कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या १७ दिवसांपूर्वी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी पाठवले आहे. यात एका कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचेही स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. मालेगावात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने मृतांचाही आकडा मोठा आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नाशिक परीक्षेत्रातून मालेगावात पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. जळगाव पोलीस दलातून १०० कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यातील ४ कर्मचाऱ्यांचे ४ दिवसांपूर्वीच स्वॅब घेण्यात आले होते, त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधी देखील ८ कर्मचारी पॉझिटिव्ह आलेले असून ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. तसेच एक दामपत्य देखील पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे.
सुरक्षेची काळजी घेत नसल्याची तक्रार
१७ दिवसांपासून जिल्ह्यातील १०० कर्मचारी मालेगावात आहेत. हे सर्व कर्मचारी हॉटस्पॉट क्षेत्रात बंदोबस्त करत आहेत. असे असतानाही त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन योग्य ती काळजी घेत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. शिवाय जेवणही निकृष्ट दर्जाचे मिळत आहे. मालेगावात १५ दिवस बंदोबस्त राहणार असल्याचे सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात पोलीस कर्मचाऱ्यांचा मुक्काम वाढवला जात आहे. अपूर्ण झोप, निकृष्ट भोजन, सुरक्षेचे साधन नसल्यामुळे पोलीस कर्मचारी आता बेजार झाले आहेत.
हेही वाचा- भाजप नगरसेवकाच्या घरात रंगला पत्त्यांचा डाव; १२ जण ताब्यात