जळगाव - 'असावे लागते पुण्यवान, त्याहीपेक्षा भाग्यवान, ज्याच्या हाताने घडते, सर्वश्रेष्ठ दान कन्यादान', असे भारतीय संस्कृतीत मानले जात. मात्र, अनिष्ट रुढी-परंपरा जोपासणाऱ्या समाजात आजही मुलगा-मुलगी असा भेदभाव होतो. मुलाच्या हव्यासापोटी कोवळ्या कळ्या गर्भातच खुडल्या जातात. काहींना जन्म दिल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा कचराकुंडीत सोडून दिले जाते. परंतु, जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना घडली आहे. निष्ठूर मातापित्यांनी जन्मानंतर रुग्णालयातच सोडून दिलेल्या एका नकोशीला सहिष्णा नामक मुलीने आपल्या वडिलांकडे हट्ट धरत आई-वडिलांचे छत्र मिळवून दिले आहे.
पाचोऱ्यातील रहिवासी सचिन सोमवंशी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जन्मलेल्या एका मुलीबद्दल माहिती मिळाली होती. आठवे अपत्यही मुलगीच झाल्याने त्या मुलीच्या निष्ठूर मातापित्यांनी जन्मानंतर तिला दवाखान्यातच सोडून दिले होते. या निष्ठूर दाम्पत्याने सातपैकी चार मुलींना यापूर्वी आजारपणामुळे गमावले होते. आता परत मुलगीच झाल्याने त्यांनी तिला नाकारले होते. रुग्णालयातील परिचारिकांनी नकोशीबाबत सोमवंशी यांना माहिती दिली. त्यांनी ही मुलगी आपल्या एखाद्या स्नेह्याला दत्तक द्यावी, असा आग्रह कुटुंबीयांकडे धरला. मात्र, कुटुंबीयांनी नकार दिला. ही बाब सचिन यांची दहावीत शिकणारी मुलगी सहिष्णाला कळली. तिने 'आपण 10 ते 15 हजार रुपयांचे कुत्र्याचे पिल्लू घरात आणू शकतो तर एखाद्या मुलीला का नको? असे म्हणत, माझा मोबाईल विका, पण नकोशीला घरी आणा, असा आग्रह वडिलांकडे धरला. मुलीचा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी सोमवंशी यांनी नकोशीला घरी आणले. सोमवंशी कुटुंबात तिच्या आगमनाचा मोठा सोहळा पार पडला. आपल्याला लहान बहीण मिळाल्याने सहिष्णा आनंदात होती. तिने नकोशीचे 'जिजा' असे नामकरण केले. ही बातमी शहरभर पसरली.
दरम्यानच्या काळात सचिन सोमवंशी यांच्या औषधांच्या दुकानावर कामाला असलेले राहुल शिंदे यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी जिजाचे पालकत्त्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली. शिंदेंच्या कुटुंबीयांनीही त्यास सहमती दिली. जिजाला हक्काचे आई-वडील मिळणार असल्याने सोमवंशींनी जिजाला दत्तक देण्याचे ठरवले. पण सहिष्णा तयार नव्हती. सोमवंशी आणि शिंदे कुटुंबीयांचे परस्परांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने जिजा कुठेही राहिली तरी डोळ्यासमोर राहील, या भावनेतून सहिष्णा अखेर तयार झाली. मग राहुल आणि जागृती शिंदे यांनी जिजाचा मुलगी म्हणून स्वीकार केला.
शिंदे कुटुंबातही जिजाच्या आगमनाचा सोहळा पार पडला. काही दिवस सोमवंशी कुटुंबात राहिलेली जिजा आता शिंदे कुटुंबाची लेक झाली आहे. जिजाच्या रुपाने घरात लक्ष्मीचे सोनपावलांनी आगमन झाल्याची शिंदे कुटुंबीयांची भावना आहे. लक्ष्मीच्या आगमनामुळे शिंदे कुटुंब आनंदात आहे. दरम्यान, समाजाने मुलगा-मुलगी असा भेद न करता मुलीला मुलाप्रमाणे स्वीकारायला हवे, अशी अपेक्षा शिंदे दाम्पत्याने व्यक्त केली आहे.