जळगाव - मनपाचे उपमहापौर सुनील खडके यांनी शहरातील नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी ‘जनता दरबार’ सुरू केला आहे. या दरबारात पहिल्याच दिवशी १५० हून अधिक नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी उपमहापौरांसमोर मांडल्या. यामध्ये ८० टक्के नागरिकांनी शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर नाराजी व्यक्त केली. खराब रस्त्यांच्या समस्येवर काहीतरी तोडगा काढा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. नागरिकांनी अस्वच्छता, अतिक्रमण व पेन्शनच्या समस्यांचा पाढा देखील वाचला.
मनपाच्या आवारात प्रथमच अशा प्रकारचा जनता दरबार भरवण्यात आला. यावेळी उपमहापौरांसह महापौर भारती सोनवणे, आयुक्त सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, ॲड. शुचिता हाडा, अमित काळे, चेतन सनकत, गायत्री राणे, मनोज आहुजा, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, ॲड. दिलीप पोकळे याच्यांसह मनपातील सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - वाहतुकीच्या बाबतीत पुण्याचे लोक घाबरतात हेच खूप - अभिनेते विजय पाटकर
रस्ते असे की पायी चालणेही कठीण
शिवकॉलनी भागातील काही महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या. अमृत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची वाट लागली असून, खोदकाम झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती होत नसल्याने काही महिलांनी रस्त्यांचा प्रश्नावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची समस्या भयंकर असून, संपूर्ण शहरात पायी चालणेही कठीण झाले असून, रस्त्यांचे काहीतरी करा, अशी मागणी महिलांनी केली. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी देखील रस्त्यांच्या प्रश्नावरच आपल्या अडचणी मांडल्या. मनपा प्रशासनाने दुसरे कामे सोडून आधी रस्त्यांचा विषय मार्गी लावावा, अशाही व्यथा नागरिकांनी मांडल्या. उपमहापौरांनी अडचणी ऐकून घेवून सर्व तक्रारी संबंधित विभागप्रमुखांकडे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच नवीन रस्त्यांचे काम होईपर्यंत दुरुस्ती करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा
महापालिकेत ३० ते ३५ वर्ष सेवा केल्यानंतरही मनपा प्रशासनाने अजूनही अनेकांना पेन्शन लागू केलेली नाही. पेन्शनसाठी दररोज मनपात हेलपाटे खावे लागत असून, मनपाने आता तरी आमचा विचार करावा अशी मागणी परवेज खान आमीरखान पठाण यांनी केली. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करावा असा ठराव १५ नोव्हेंबर २०१९ रोजी महापालिकेने केला होता. मात्र, या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याची माहिती पठाण यांनी दिली. मनपाने तत्काळ या ठरावाची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. याबाबत उपमहापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
या विषयांवर मांडल्या समस्या
अमृत योजना, भुयारी गटारी यामुळे नादुरुस्त झालेले रस्ते, अस्वच्छता, स्ट्रीट लाईट नसल्याने रात्री पसरणारे अंधाराचे साम्राज्य, अव्यवस्थित ओपन स्पेसेस, डासांचा उपद्रव, खड्डयामुळे वाहन चालवितांना होणारे हाल, खड्डे न बुजल्याने घडणारे किरकोळ अपघात, अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे आदींबाबत नागरीकांनी जनता दरबारात गाऱ्हाणी मांडली. जनता दरबारात सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित असल्याने किरकोळ तक्रारींबाबत जागीच कार्यवाही योजण्यात आली. व्यतिरिक्त अनेकांनी लेखी स्वरुपातही तक्रारी दाखल केल्या.
हेही वाचा - हिंदू संस्कृतीची टिंगलटवाळी खपवून घेणार नाही - हिंदू राष्ट्र सेना