जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गुरुवारी तब्बल 6 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 37 वर पोहचली आहे. यापैकी 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी जळगाव आणि भुसावळमध्ये प्रत्येकी 2 तर अमळनेर आणि पाचोऱ्यात प्रत्येकी 1 असे एकूण 6 रुग्ण आढळून आले.
जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या एकूण 68 रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाले. त्यातील 62 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह तर 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा तसेच 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच अमळनेर येथील 55 वर्षीय पुरुष, पाचोरा येथील 56 वर्षीय पुरुष तर जळगाव येथील 30 व 57 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37 झाली आहे. यापैकी 10 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर, एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. जळगाव, पाचोरा, अमळनेर आणि भुसावळ या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकांना लॉकडाऊनचे गांभीर्य नसल्यानेच ही गंभीर परिस्थिती ओढावली आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची गरज आहे. त्यामुळे, आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.